पुणे : गेले वर्षभर अशांत असलेल्या व त्यामुळे देशभर गाजत असलेल्या मणीपूरमधील काँग्रेस पक्षाचे खासदार अग्नोमाचा बिजोय अकोइजम हे शुक्रवारी (दि.७) पुण्यात येत आहेत. मॉडर्न एज्यूकेशन सोसायटीच्या नवरोसजी वाडिया महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थी संघाने महाविद्यालयात शनिवारी (दि. ८) सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलणार आहेत.काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांचाही या कार्यक्रमात गौरव होणार आहे. तेही वाडिया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. संघटनेचे सचिव डॉ. पी. के पटेल यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता खासदार अग्नोमाचा यांचे पुण्यात विमानाने आगमन होईल. ते वाडिया महाविद्यालयात सन १९८५ ते १९८९ या कालावधीत पुण्यात हाेते. सायकॉलॉजी या विषयात त्यांनी पदवी मिळवली होती.मणीपूरमध्ये गेल्यावर मणीपूर, दिल्ली येथील विविध शिक्षणसंस्थांमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मणीपूरमधील काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक लढवली व ते विजयी झाले. वाडिया महाविद्यालयात शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात ते मणीपूरमधील अशांतता, त्याची कारणे व उपाय यासंबंधी बोलतील असे अपेक्षित आहे.
मणीपूर काँग्रेसचे खासदार उद्या पुण्यात
By राजू इनामदार | Updated: February 6, 2025 20:21 IST