Mangoes increasing in the market yard | मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली
मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली

ठळक मुद्देवातावरणातील बदलामुळे हापूस आंब्यांच्या उत्पादनावर परिणाम

पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातीलआंब्यांची आवक वाढली. रत्नागिरी हापूसच्या पाच ते साडेपाच हजार पेट्यांची आवक झाली आहे़.  तर कर्नाटक हापूस, पायरी व इतर प्रकारच्या आंब्याच्या तब्बल १५ हजार पेट्या तसेच ३० हजार के्रटसची आवक झाली. वातावरणातील बदलामुळे रत्नागिरी हापूस व कर्नाटकातील हापूसच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली़.
यंदा फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरु झाली. दरम्यान तापमानातील बदल तसेच अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांच्या प्रतवारीवर काहीसा परिणाम झाला आहे. आंब्यांचा आकार लहान आणि मध्यम आहे. कर्नाटकातील तुमकुर भागात आंब्यांची मोठी लागवड केली जाते. या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले़  आंब्याची आवक वाढू लागली असून ग्राहकांकडून मागणीही वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़
रत्नागिरी हापूस आंब्याचे दर पुढीलप्रमाणे-हापूस कच्चा आंबा (४ ते ८ डझन पेटी) १२०० ते ३५०० रुपये, तयार आंबा (४ ते ८ डझन पेटी) १५०० ते ३५०० रुपये़ रत्नागिरी हापूस तयार आंबा (५ ते १० डझन पेटी) २००० ते ४५०० रुपये. कर्नाटकातील आंब्यांचे दर पुढीलप्रमाणे-कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन पेटी)- ८०० ते १६०० रुपये, पायरी (४ डझन पेटी) ५०० ते ८००, लालबाग- २५ ते ४५ रुपये किलो, बदाम/ बैंगनपल्ली- ३० ते ४० रुपये किलो.


Web Title: Mangoes increasing in the market yard
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.