पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. सूरज देवेंद्रपंत लांडे (२७, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणीत दिलीप गोंडेकर (२४, रा. योगानंद पीजी. हिंजवडी फेज एक) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रणीत अणि सूरज मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरून निघाले होते. चांदणी चौकापासून काही अंतरावर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबवली. त्यानंतर सूरज दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाला. त्या वेळी समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वार सूरज याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरजचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी शेलार पुढील तपास करत आहेत.