शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक;पोलिसांनी अफूची २१८ झाडे केली जप्त
By नारायण बडगुजर | Updated: February 28, 2025 09:38 IST2025-02-28T09:37:09+5:302025-02-28T09:38:07+5:30
काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली

शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक;पोलिसांनी अफूची २१८ झाडे केली जप्त
पिंपरी : देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे शेतात लावलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. २६ फेब्रुवारी) ही कारवाई केली.
दिलीप चंद्रकांत काळोखे (५७, रा. काळोखे वस्ती, देहूगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी किशोर परदेशी आणि जावेद बागसिराज यांना माहिती मिळाली की, देहूगाव येथे काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली आहेत. त्यानुसार पोलिसांनी दिलीप काळोखे याच्या शेतात छापा मारून कारवाई केली.
शेतामध्ये कांद्याच्या पिकात अफू लावला होता. अफूच्या झाडांना फुले, बोंडे आली होती. पोलिसांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीची २१८ अफूची झाडे जप्त केली.
सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सचिन कदम, पोलिस अंमलदार किशोर परदेशी, जावेद बागसिराज, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, राजेंद्र बांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.