आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गुंतवणुकीच्या आमिषाने १५ कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 21:09 IST2021-01-06T21:07:04+5:302021-01-06T21:09:58+5:30
गुंतविलेल्या रक्कमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.

आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गुंतवणुकीच्या आमिषाने १५ कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक
पुणे : गुंतविलेल्या रक्कमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोटयवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज भागचंद छल्लाणी (रा. ओमशांती, रघुवीर सोसायटी, मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याने किमान १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नाेव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, छल्लाणी याचे पुणे -सातारा रोडवरील आदिनाथ सोसायटीजवळील टाईम केअर बिल्डिग येथे कार्यालय आहे. छल्लाणी हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत असतो. अंची व त्यांच्या पत्नीने त्याच्याकडे नोव्हेंबर २०१४ मध्ये ६५ लाख रुपये गुंतवले. मार्च २०१८ मध्ये ठेव रक्कम व त्यावरील व्याज तो परत देणार होता. परंतु, अंची व इतरांनी अनेकदा मागणी करुनही छल्लाणी याने त्यांचे पैसे परत केले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी छल्लाणी याला अटक केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी सांगितले की, छल्लाणी हा अनेक वर्षांपासून लोकांकडून पैसे घेऊन ते प्रॉपर्टीत गुंतवणूक करीत असे. त्यातून येणार्या नफ्यातून लोकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवत असे. मात्र, त्याने २०१८ पासून लोकांचे पैसे देणे बंद केल्याने लोकांनी तक्रार केली आहे. आतापर्यंत ३५ तक्रारी आल्या असून त्यात फसवणूक झाल्याची रक्कम जवळपास १५ कोटी रुपयांइतकी आहे. आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.