स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:23 IST2025-01-08T20:22:28+5:302025-01-08T20:23:49+5:30
आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्याने जिंकेल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकेल
कवठे यमाई: महायुती सरकाने काही वर्षांमध्ये जलदगतीने विकास कामे केली. तसेच अडीच वर्षात घेतलेल्या विकास कामांच्या निर्णयामुळे महायुतीला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यश दिले. त्यामुळे आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्याने जिंकेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळ्यावेळी देवीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सरपंच राजश्री रुपनेर, उपसरपंच योगेश पुंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामराव सासवडे, पोपट धोत्रे, बापू शिंदे, बबन शिंदे, सोपान जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, मेसाई देवीच्या दर्शनासाठी मी नेहमी येत असतो. सध्या शिरुरला बऱ्याच वर्षांनंतर देवीच्या दर्शनाला आलो आहे. येथे आल्याने अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या, तसेच सर्वसामान्य लोकांच्या व्यथा समजल्या. सध्या कान्हूर मेसाई गावात खूप बदल झाला आहे, येथे येऊन मला येथील लाडक्या बहिणी भेटल्या. शिरुर तालुक्यातील बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना, “येथील पाण्याच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी व संबंधित विभागांशी चर्चा करणार,” असे आश्वासन त्यांनी दिले. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना यासंदर्भातील अहवाल बनवून पाठवण्याच्या सूचनाही दिल्या.