वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी 'हा' टोल फ्री क्रमांक वापरा, महावितरणचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:24 IST2025-04-28T15:22:40+5:302025-04-28T15:24:18+5:30
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी 'हा' टोल फ्री क्रमांक वापरा, महावितरणचे आवाहन
बारामती : वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालविण्यापेक्षा वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक :१९१२,१८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा व वीजबिलासंबंधीच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महावितरणने केले आहे. वीज ग्राहकांची संख्या बारामती परिमंडलाची ३० लाखांत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते.
२४ तासांत तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा १२ अंकी ग्राहक क्रमांक नोंदविल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. ती तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. तसेच तक्रारीची नोंद ऑनलाइन प्रणालीत झाल्यामुळे मा. वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वेळेत सोडवणे बंधनकारक बनते. ज्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाइन प्रणालीत होते. त्याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. कारण ज्यावेळी एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा एकाच वेळी त्याला अनेक फोन येतात. प्रत्येक जण त्याचे नाव, पत्ता सांगण्यात वेळ घालवतो. तसेच फोन चालू असल्यामुळे त्याला फॉल्ट शोधता येत नाही. खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना घेतलेला कॉल त्याचा जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे वैयक्तिक फोन करणे टाळावे.
वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरून ०२२...५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाइलवरून ‘NOPOWER<ग्राहक क्रमांक>’ हा संदेश टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते. व तसा संदेश ग्राहकाला मिळतो. महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाइन झालेल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे ॲप प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरहून डाऊनलोड करावे. यामध्ये एकापेक्षा जास्त वीज जोडण्या एकदाच नोंदणी करून हाताळता येतात. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येतो.