नव्या पिढीत वैचारीक स्पष्टता येण्यासाठी फुलेंचे काम मार्गदर्शक ठरेल - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:59 IST2025-07-03T20:59:14+5:302025-07-03T20:59:36+5:30
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षण, शेती, सामाजिक काम, शैक्षणिक काम, उद्योग या क्षेत्रात मोठे योगदान आहे.

नव्या पिढीत वैचारीक स्पष्टता येण्यासाठी फुलेंचे काम मार्गदर्शक ठरेल - शरद पवार
पुणे: महात्मा जोतिबा फुले यांच्या मनाला कधी धर्मप्रसाराचा विषय पटला नाही. त्यांनी आयुष्यभर केवळ आधुनिकता व विज्ञान या गोष्टींचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले. आज देशात आणि महाराष्ट्रात जे एक सामाजिक वातावरण निर्माण होत आहे, त्या विचार करता नव्या पिढीमध्ये वैचारिक स्पष्टता येण्यासाठी महात्मा जोतीबा फुले व त्यांचे काम नक्की मार्गदर्शक ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
कामिल पारखे लिखित ‘सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसूरी या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, सचिव दीपक गिरमे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, चेतक बुक्सचे मदन हजेरी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षण, शेती, सामाजिक काम, शैक्षणिक काम, उद्योग या क्षेत्रात मोठे योगदान आहे. देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात विशिष्ट सामाजिक वातावरण तयार होत आहे. नव्या पिढीत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी फुले दाम्पत्याचे काम आदर्श ठरेल. फुले दांपत्याचे विचार समाजाच्या मोठा वर्गापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र, अजूनही त्यावर खूप काम करण्याची गरज आहे.
शिक्षणाचा विस्तार हा इंग्रजांच्या धोरणाचा भाग होता. त्यांनी शिक्षण देण्यासाठी संस्थात्मक उभारणी केली. त्यामध्ये मिशन केंद्र उभे करून शिक्षण दिले जात होते. सामान्य कुटुंबातील मुलामुलींना त्याचा लाभ होत होता. जोतिबा फुले यांनी या पार्श्वभूमीचा फायदा घेतला. भिडे वाड्यापासून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. मात्र, तथाकथित पुणेकरांकडून त्यांना यातना सहन करावी लागली. मात्र, त्यांनी आपले मिशन सोडले नाही. या सगळ्यांवर मात करून त्यांनी पुढे जाण्याची त्यांची जी भूमिका होती ती खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावी, अशी होती.
खडकवासला धरण बांधणाऱ्या ठेकेदारांमध्ये फुले अग्रस्थानी होते. त्यांनी मर्यादित साधन सामुग्री असताना कात्रजचा बोगदा तयार केला. जॉर्ज पंचम मुंबईत आल्यानंतर फुले यांनी त्यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी केलेल्या मागण्या त्यांचा आधुनिकतेचा दृष्टीकोन दर्शवणाऱ्या होत्या. त्यांची ही दृष्टी एकप्रकारे चमत्कारच होती, असेही पवार म्हणाले. सूत्रसंचालन राहुल माने यांनी तर जॅकलीन पारखे यांनी आभार मानले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा क्षेत्रात काम केले. त्यांनी नव्या पिढीत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार रुजवला. त्यांनी संघर्ष व लोक शिक्षणाचे काम केले. - शरद पवार