Mpsc President 2023: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या अध्यक्षपदी डाॅ. दिलीप पांढरपट्टे
By प्रशांत बिडवे | Updated: September 26, 2023 16:46 IST2023-09-26T16:46:00+5:302023-09-26T16:46:32+5:30
डॉ. पांढरपट्टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी काेकणात उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनात सेवा बजावली

Mpsc President 2023: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या अध्यक्षपदी डाॅ. दिलीप पांढरपट्टे
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाचे सदस्यपदी कार्यरत असलेले डाॅ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची आयाेगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष किशाेर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ दि. १९ सप्टेंबर राेजी संपुष्टात आला. त्यानंतर रिक्त जागेवर राज्यपालांनी साेमवारी (दि. २५) डाॅ. पांढरपट्टे यांची नियुक्ती करीत अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार साेपविला आहे. सामान्य प्रशासन विभागातर्फे याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयाेगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती हाेईपर्यंत डाॅ. पांढरपट्टे अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत.
डॉ. पांढरपट्टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी काेकणात उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनात सेवा बजावली. सन २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती मिळाली. सन २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मार्च महिन्यांत त्यांची एमपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली हाेती.