Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती

By नितीन चौधरी | Published: April 13, 2024 06:04 PM2024-04-13T18:04:48+5:302024-04-13T18:08:25+5:30

सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे...

Maharashtra: Only 33 percent of water reserves left, critical situation in Marathwada, more than 2 thousand tankers running | Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती

Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती

पुणे : राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून सबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विभागात आजपर्यंत तब्बल १ हजारांहून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात २२ जिल्ह्यांत एकूण दोन हजारांहून अधिक टँकर सुरू झाले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ९ टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे.

एप्रिलच्या मध्यावर राज्यात पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ ३३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमधील उपयुक्त साठा १३ हजार ६८९ दशलक्ष घनमीटर असून एकूण साठा २० हजार ६१४ दशलक्ष घनमीटर इतका शिल्लक राहिला आहे. गेल्या याच दिवशी राज्यात ४२.१९ टक्के पाणीसाठा होता. सर्वाधिक भीषण स्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७टक्केच पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर पातळीवर पोचली असून धरणात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात ३३.८८ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ३९ टक्के साठा आहे.

पुणे विभागतही गंभीर स्थिती

राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या पुणे विभागातही पाण्याची स्थिती गंभीरच आहे. येथे एकूण क्षमतेच्या केवळ ३१.७२ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. विभागातील सर्व धरणांत मिळून ४ हजार ८२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त तर ७ हजार २९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विभागातील सर्वांत मोठ्या असलेल्या कोयना प्रकल्पात क्षमतेच्या ४२.२४ टक्के पाणीसाठा आहे. तर उजनी धरणात शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनीतील साठा सध्या उणे स्थितीत आहे. कोकण विबागात तुलनेने राज्यात सर्वाधिक ४७ टक्के साठा असला तरी उपयुक्त साठा केवळ १ हजार ७४८ दशलक्ष घनमीटर इतकाच आहे. तर एकूण साठा १ हजार ९१३ दशलक्ष घनमीटर आहे. विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात अनुक्रमे ४४.३९ व ४६.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक विभागात ३४.८७ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यात २ हजार टँकरद्वारे पुरवठा

पाण्याची स्थिती गंभीर बनत चालल्याने राज्यात आजमितीस सुमारे २ हजार ९३ टँकरद्वारे २२ जिल्ह्यांतील १ हजार ६६५ गावे व ४ हजार वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ मराठवाडा विभागाला बसली असून येथे १ हजार ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल नाशिक विभागात ४८१ तर पुणे विभागात ४२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वात कमी २ टँकर नागपूर विभागात सुरू असून अमरावतीत ४० तर मुंबईत विभागात ८४ टँकर सुरू आहेत.

राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती (टक्क्यांत)

नागपूर ४४.४९
अमरावती ४६.६४

संभाजीनगर १७.०५
नाशिक ३४.८७

पुणे ३१.७२
मुंबई ४७.२१

एकूण ३३.८१

Web Title: Maharashtra: Only 33 percent of water reserves left, critical situation in Marathwada, more than 2 thousand tankers running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.