निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:55 IST2025-04-15T14:01:55+5:302025-04-15T15:55:50+5:30

अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै.शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता

Maharashtra Kesari 2025 Controversy Finally, umpire Nitesh Kabliya has been suspended for 3 years by the Maharashtra State Wrestling Association. | निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

पुणे -  ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा केवळ खेळासाठी नव्हे, तर वादासाठीही चांगलीच चर्चेत राहिली. गादी विभागातील अंतिम फेरीत पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीत घेतलेल्या वादग्रस्त चितपटीच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.अखेर या प्रकरणी चौकशी होऊन मुख्य पंच नितिश कावलिया यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई जाहीर केली आहे.

२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानावर ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे यांना "ढाक" मारत चितपट केल्याचा निर्णय देण्यात आला. मात्र, हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने विवादित ठरला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने २८ फेब्रुवारी रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये मुख्य पंच नितिश कावलिया यांची निर्णय प्रक्रिया चुकीची ठरवण्यात आली.

चुकीचा निर्णय, योग्य कारवाई

चौकशीतून निष्पन्न झाले की, चितपटीच्या निर्णयासाठी पंच नितेश कावल्या यांनी मेन्ट चेअरमन व साईड पंचांची सहमती घेतली, मात्र त्या क्षणी राक्षे यांची पाठ स्पष्टपणे कुणालाही दिसत नव्हती. व्हिडीओ फुटेजमध्ये हा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्य पंच नितिश कावलियावर यांच्यावर दोष निश्चित करत, त्यांना तीन वर्षांसाठी कुस्ती पंचगिरीपासून निलंबित करण्यात आले.

दत्तात्रय माने, विवेक नाईकल निर्दोष

चौकशी अहवालात मॅट चेअरमन दत्तात्रय माने व साईड पंच विवेक नाईकल यांच्यावर कोणतीही चूक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी परिस्थितीनुसार योग्य सल्ला व निर्णय दिला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

पंचांवरील ताण वाढतोय

कुस्तीदरम्यान मॅटच्या आजूबाजूला पाहुणे, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पंचांवर मोठा मानसिक ताण येतो. या तणावात निर्णय घेणे कठीण ठरते. त्यामुळे भविष्यात अशा चुकांपासून बचाव करण्यासाठी पंचांच्या कार्यक्षेत्रात कुणालाही प्रवेश देऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कुस्ती क्षेत्रात पारदर्शकतेचा संदेश गेला असून, भविष्यात अशा प्रकरणांना आवर घालण्यास ही बाब निर्णायक ठरेल, असा विश्वास कुस्तीप्रेमींनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडले 

 कुस्ती सुरू होऊन ४० सेकंद झाल्यानंतर लाल कॉच्युम घातलेल्या पै. पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे यास ढाक मारून धोकादायक स्थितीमध्ये पकडुन ठेवले होते. त्यावेळी पै. शिवराज राक्षेचे पाय मेंट चेअरमनच्या बाजुला, डोके व छाती साईड पंचाच्या बाजुला या स्थितीमध्ये होते. कुस्तीचे मुख्य पंच नितिश कावलिया हे लाल झोनवर गुडघ्यावर बसुन शिवराजची पाठ मेंटला टेकली का नाही हे पहात होते परंतु शिवराजच्या पाठीच्या अगदी विरूध्द बाजुला मेंट चेअरमन व साईड पंच बसलेले होते त्यामुळे त्यांना पाठीकडील बाजु स्पष्ट दिसत नव्हती तसेच मॅटच्या चहु बाजुने असलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना उठुन जाऊन पहाणे सुध्दा शक्य नव्हते त्यामुळे शिवराजच्या तोंडाची व छातीची दीक्षा पाहूनच त्यांना निर्णय घ्यायचा होता.

ढाक मारून ६ सेंकद झाल्यावर मुख्य पंच श्री नितिश कावलिया यांनी शिवराजची पाठ मेंटला टेकली असे समजुन मुख्य पंच दत्तात्रय माने यांच्याकडे कुस्ती मागितली परंतु दत्तात्रय माने यांच्याकडे शिवराजचे पाय असल्याने तसेच पृथ्वीराजने शिवराजची मान उजव्या वगलेत घट्ट दाबुन धरली असल्याने दत्तात्रय माने यांना शिवराजच्या पाठीची बाजू दिसत नव्हती त्यामुळे त्यांनी नितेश कायलिया यांना साईड पंच विवेक नाईकल यांच्याकडे हाथ करून त्यांची सहमती घ्या असा निर्णय दिला. दत्तात्रय माने यांनी केलेल्या हाताच्या खुणेचा योग्य ईशारा समजुन नितिश कावलिया यांनी विवेक नाईकलकडे कुस्ती मागितली वास्तविक विवेक नाईकलच्या बाजुने सुध्दा पाठ दिसत नव्हती परंतु पृथ्वीराज मोहोळने ज्या स्थितीत शिवराज राक्षे यास पकडले होते.

त्याच्या डोक्याचा व छातीचा अंदाज घेऊन साईड पंच विवेक नाईकल यांनी नितेश कावलिया यांना चितपटीला सहमती दर्शवली व नंतर नितेश कावलिया यांनी शिट्टी मारून कुस्ती चितपट झाल्याचा निर्णय दिला या निर्णयास शिवराजच्या कोचने आक्षेप घेतला परंतु तिन्ही पंचाच्या सहमतीने एकत्रित निर्णय झाला असल्याने अपिल ऑफ ज्युरीने कोचने केलेले अपिल फेटाळून लावले व व्हिडीओ पहाण्यास नकार दिला.

Web Title: Maharashtra Kesari 2025 Controversy Finally, umpire Nitesh Kabliya has been suspended for 3 years by the Maharashtra State Wrestling Association.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.