पुणे : विधानसभेसाठी नवे कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यात सोमवारी उस्तूर्तपणे मतदान करत लोकशाहीचा उत्सव नागरिकांनी साजरा केला. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मतदानावर पावसाचे सावट होते. मात्र, काही ठिकाणी केवळ ढगाळ हवामान तर काही ठिकाणी उन असल्याने नागरिकांनी बाहेर पडत आपला हक्क बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४१ टक्के मतदानाची नोंद जिल्ह्यात झाली होती.

काही ठिकाणी इव्हीएम मध्ये किरकोळ बिघाड झाले. मात्र, तातडीने त्याठिकाणी दुरूस्ती करून मतदान सुरळीत करण्यात आले. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेमार्फ त चोख व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहचवीण्यात आली होती. पावसाचे सावट असल्याने मतदानावर याचा परिणाम होईल अशी शंका होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने मतदार सकाळपासूनच घराबाहेर पडले. बारामतीत  पवार कुटुंबियांनी एकत्र  येत मतदानाचा हक्क बजावीला. आंबेगाव तालुक्यात माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या कुुंटुंबियांसोबत मतदान केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार राहुल कुल, यांनीही सपत्नीक मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावीला.


जिल्ह्यात काही ठिकाणी इव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. खेड आळंदी विधानसभा मतदार संघात वाकी बुद्रुक गावातील गारगोटे शिवार येथील मतदान २२९ क्रमांकाच्या मतदान केंद्रात इव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान तब्बल एक तास उशीरा सुरू झाले. यामुळे सकाळीच मतदान करण्यास आलेले अनेक नागरिक मतदान न करताच परत गेले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथील मतदान केंद्रातील मशीन बंद पडले. नवीन मशीन येण्यास उशीर झाल्याने तो पर्यंत मतदान थांबले होते.

तीन वाजेपर्यंत जुन्नर तालुक्यात ४९.०३, आंबेगाव तालुक्यात ५२.५४, खेड तालुक्यात ४८.५३, शिरूर तालुक्यात ४४.४६, दौंड तालुक्यात ४९.२,  इंदापुर तालुक्यात ५२.२७, बारामती तालुक्यात ५२.२, पुरंदर तालुक्यात ४६.४, भोर तालुक्यात ४८.७६ तर मावळ तालुक्यात ५३.६ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानास आणखी दोन तास बाकी असून या वेळेत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
 


Web Title: Maharashtra Election 2019 : 41 percent voting to afternoon 3 pm In Pune district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.