एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:09 IST2026-01-28T11:09:47+5:302026-01-28T11:09:47+5:30
Dy CM Ajit Pawar Dies : आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले.

एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द
Dy CM Ajit Pawar Dies : महाराष्ट्र राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीच्या दिशेने निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानात असलेल्या सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
निवडणुकीसाठी लावला होता जोर
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. याची कसर भरून काढण्यासाठी अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. विशेषतः पुणे जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते आणि त्याच प्रचारासाठी ते आज बारामतीला येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
खासदार सुप्रिया सुळे यांची भावूक प्रतिक्रिया
या हृदयद्रावक घटनेनंतर राजकीय स्तरातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर "DEVASTATED" असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.