LPG Gas Crisis सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:12 IST2026-03-13T19:10:49+5:302026-03-13T19:12:11+5:30
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असून नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडरसाठी रांगा लावू नयेत, असे आवाहनही केले आहे.

LPG Gas Crisis सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
पुणे : युद्धजन्य परिस्थितीत केवळ व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. तरीही काही जण या परिस्थितीचा गैरफायदा घेत असून जादा दराने अर्थात गॅसचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशी कबुली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
त्यामुळे शहरासह जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असून नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडरसाठी रांगा लावू नयेत, असे आवाहनही केले आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरासह जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसचा पुरवठ्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचा पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळली असून गॅस सिलिंडरसाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा स्थगित केला असला तरी घरगुती पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच पुरेशा प्रमाणात पुरवठाही होत असून सध्याचा साठाही पर्याप्त स्वरूपात असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, ही परिस्थिती आणखी बिघडू नये, सिलिंडरचा साठा तसेच काळाबाजार करू नये यासाठी पुरवठा विभागाने दक्षता पथकांची स्थापना केली आहे. शहर व पिंपरीत तीन पथके तर प्रत्येक तालुक्यात पुरवठा निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पथके पुरवठादारांची अचानक तपासणी करत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी जादा दराने सिलिंडरची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून संबंधितावर कारवाई करण्यात आल्याची माहिती डुडी यांनी दिली. अशा पद्धतीने काळा बाजार करणाऱ्या पुरवठादारांवर कठोर कारवाईचा इशारा देत त्यांचा परवानाही निलंबित करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.
वसतिगृहे, रुग्णालये यांना प्राधान्याने पुरवठा
दरम्यान शहरातील व जिल्ह्यातील रुग्णालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले आहे. सिलिंडरचा पुरवठा करताना गेल्या सहा महिन्यांचा वापर लक्षात घेऊन पुरवठा करण्यात येत असल्याने जिल्ह्यातही पुरेसा पुरवठा असल्याचे ते म्हणाले.
परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिलिंडरचा पुरेशा प्रमाणात साठा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कुठेही रांगा लावू नयेत. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी