LPG Gas Crisis : खानावळीचे पैसे आधीच भरलेत, आता दुसरी व्यवस्था कशी करणार? विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:08 IST2026-03-15T13:08:07+5:302026-03-15T13:08:33+5:30
खानावळीचे पैसे आधीच भरलेत, आता दुसरी व्यवस्था कशी करणार, अशी विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

LPG Gas Crisis : खानावळीचे पैसे आधीच भरलेत, आता दुसरी व्यवस्था कशी करणार? विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर
- अतुल क्षीरसागर
रावेत : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा परिसरात सध्या मेस आणि खानावळचालक सापडले आहेत. थाळीतील पदार्थ कमी करणे किंवा लहान सिलिंडर, इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर किंवा बाहेरून अन्न मागवण्याच्या पर्यायाकडे त्यांना वळावे लागले आहे, तर खानावळीचे पैसे आधीच भरलेत, आता दुसरी व्यवस्था कशी करणार, अशी विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
वाल्हेकरवाडीच्या गुरुद्वारा परिसरात पाच ते सहा महाविद्यालये, अनेक लघु-मोठ्या औद्योगिक कंपन्या असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांची आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची व तरुणांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांशजण रोजच्या जेवणासाठी स्थानिक खानावळीवर अवलंबून आहेत. परवडणाऱ्या दरात घरगुती जेवण मिळत असल्याने ते मेसचा पर्याय शोधतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने खानावळचालक अडचणीत सापडले आहेत.
बहुतांश विद्यार्थ्यांनी खानावळीचे महिन्याचे पैसे आधीच भरलेले आहेत. मात्र गॅस उपलब्ध नसल्यामुळे कधी जेवण उशिरा तयार होत आहे, तर कधी साधेच जेवण मिळत आहे. थाळीतील पदार्थ कमी झाले आहेत. काही मेस चालकांनी लहान सिलिंडर, इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर किंवा बाहेरून अन्न मागवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, शेकडो विद्यार्थ्यांसाठी रोजचे जेवण बनवताना हे पर्याय दीर्घकाळासाठी नसल्याचे खानावळ चालकांचे म्हणणे आहे.
शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलो आहोत. जेवणासाठी खानावळीवरच अवलंबून राहावे लागते. गॅसचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कधी जेवण उशिरा मिळते, तर कधी साधे जेवण मिळते. - ओम पवार, विद्यार्थी.
खानावळीचे पैसे आधीच भरलेले असतात. त्यामुळे अचानक दुसरी व्यवस्था करणे शक्य होत नाही. गॅस सिलिंडर वेळेत मिळाले, तर ही अडचण दूर होईल. - प्रणव पाटील, विद्यार्थी.
‘पीजी’मध्ये स्वयंपाकाची सुविधा नाही. त्यामुळे मेसमध्ये जेवण करतो. ती बंद पडली, तर आम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जावे लागते, जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. - क्षितिजा कोमटे, विद्यार्थिनी.