LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:51 IST2026-04-05T14:50:50+5:302026-04-05T14:51:44+5:30
- एमआयडीसीतील उद्योगांसमोर गॅस टंचाईचे संकट कायम : फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हिटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता

LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी
- गोविंद बर्गे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात सध्या ‘एलपीजी’ची टंचाई तीव्र झाली असून, त्यावर उपाय म्हणून ‘एमएनजीएल’कडून पाईपने गॅस (पीएनजी) देण्यासाठी एमआयडीसी कार्यालयात शिबिर झाले. मात्र, फॅब्रिकेशनसह लोखंड कापण्याचे काम करणाऱ्या उद्योगांसाठी ‘पीएनजी’ हा पर्याय फारसा उपयुक्त ठरत नसल्याचे समोर आले आहे.
एमआयडीसीतील अनेक लघू व मध्यम उद्योगांमध्ये द्रवीभूत पेट्रोलियम गॅसचा (एलपीजी) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हीटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता असते. एलपीजी सिलिंडरमधून मिळणारा दाब आणि ज्वाळेची तीव्रता या प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असते. लोखंड कापण्यासाठी ‘ऑक्सी-एलपीजी कटिंग’ पद्धत वापरली जाते. यामध्ये एलपीजी गॅस उच्च दाबाने जळून तीव्र ज्वाळा निर्माण करतो, त्यामुळे जाड लोखंडी पत्रे व ढाचे सहज कापता येतात. सतत आणि नियंत्रित दाबामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते.
याउलट पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कमी दाबाने पुरविला जातो. त्यामुळे फॅब्रिकेशनसारख्या उद्योगांमध्ये आवश्यक असलेली उच्च तापमानाची ज्वाळा तयार होत नाही. परिणामी, लोखंड कापण्याची प्रक्रिया मंदावते किंवा पूर्णपणे शक्य होत नाही. काही उद्योगांनी पीएनजी वापरून पाहिले असता अपेक्षित परिणाम मिळाला नसल्याचेही समोर आले आहे. विशेषतः ज्या कंपन्यांचे काम पूर्णपणे गॅस कटिंग आणि जड फॅब्रिकेशनवर अवलंबून आहे, त्यांना ‘पीएनजी’चा फायदा होत नाही.
एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दोन किलो दाबाच्या गॅसची गरज भासते. एलपीजी गॅसमध्ये तो असतो. पीएनजीमधून तो मिळत नसल्याने प्रेशर मिळण्यासाठी एखाद्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. - सतीश जाधव, उद्योजक, फॅब्रिकेशन इंडस्ट्रीज.
एलपीजी गॅसटंचाईबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. येथील ९० टक्के लघुउद्योगांना एलपीजीची गरज आहे. अपेक्षित दाब मिळत नसल्याने पीएनजीचा उपयोग होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर काही तोडगा काढता येईल का, यासाठी एमएनजीएल अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनायेथील काही उद्योगांमध्ये प्रोफाइल कटिंगसारख्या प्रक्रियांसाठी एलपीजीचा वापर होत असून, तेथे नैसर्गिक वायूचा पर्याय वापरण्याची शक्यता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमएनजीएलकडून ३५० मिलिबार किंवा दोन बार दाबाने पीएनजी पुरवठा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. - प्रवीण गायकवाड, उपमहाव्यवस्थापक (विपणन), एमएनजीएल