LPG Gas Crisis: गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:06 IST2026-04-06T13:05:29+5:302026-04-06T13:06:06+5:30
LPG Gas Crisis एजन्सी चालकाचा मनमानी कारभार सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

LPG Gas Crisis: गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी
अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील साक्षी एचपी गॅस एजन्सीची गावोगावी फिरणारी गॅस सिलिंडर गाडी गेल्या एक ते दीड महिन्यापासून न आल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एजन्सी चालकाचा मनमानी कारभार सुरू असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव, लोणी, धामणी, मेंगडेवाडी, गावडेवाडी आदी गावांमध्ये एचपी गॅसचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून गावात सिलिंडर गाडी येत नसल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतर मोटरसायकलवरून पार करून कळंब येथे जावे लागत असून, जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
कळंब येथील एजन्सीवर दररोज एक ते दोन किलोमीटरपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. नियोजनाअभावी नंबरवरून वाद होण्याचे प्रकार घडत असून, महिलांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. सिलिंडर वाटप सकाळी सहा ते नऊ या वेळेतच होत असल्याने एक दिवस आधी जाऊन नंबर लावावा लागतो. वेळेत पोहोचता न आल्यास रिकामी टाकी घेऊन परत जावे लागते. एक सिलिंडर मिळवण्यासाठी तब्बल ३०० रुपयांपर्यंत खर्च होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. देवगाव, लाखनगाव, वडगाव पीर, मांदळवाडी आदी गावांतील नागरिकांना ३० ते ३५ किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. सध्या तालुक्यात यात्रांचा हंगाम सुरू असून, पिंपळगाव, चांडोली, मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, पेठ, कारेगाव आदी गावांमध्ये पुढील काही दिवसांत यात्रा होणार आहेत. त्यामुळे गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी गॅस सिलिंडरची चढ्या दराने विक्री होत असल्याची चर्चा असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. या संदर्भात तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ व तालुका पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत तालुका पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार यांनी सांगितले की, संबंधित एजन्सीला सोमवारपासून सर्व गावांमध्ये गॅस गाडी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, कळंब येथे पहाटे होणारे सिलिंडर वाटप बंद करण्याबाबतही सूचना देण्यात येणार आहेत.
तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी मालकांची पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेऊन ग्राहकांना गावोगावी शक्य तेवढ्या गॅस सिलिंडर टाक्या पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. तालुक्यात इंडियन गॅस कंपनीचे तीन डीलर असून, त्यांना गॅस पुरवठा सुरळीत आहे, परंतु आंबेगाव तालुक्यात एचपी गॅसची एकच एजन्सी आहे त्याचे एकूण १९ हजार गॅसधारक आहेत. एजन्सीकडे दररोज ६०० ते ७०० गॅस सिलिंडरची मागणी आहे. मागील एक महिन्यापासून एचपी एजन्सीकडे दररोज ३५० गॅस टाकी येत आहे. तरी, मंगळवारपासून गावोगावी भरलेली गॅस सिलिंडरची गाडी पाठवण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला दिल्या आहेत.- डाॅ. सचिन वाघ, तहसीलदार आंबेगाव
आमच्याकडे १९,८२४ घरगुती ग्राहक आहे, परंतु अमेरिका, इस्राईल, इराण युद्ध चालू झाल्यापासून मागील एक महिन्यापासून दररोज साडेतीनशे भरलेल्या सिलिंडर टाकी कंपनीकडून येत आहेत. आम्हाला दररोज ६०० ते ७०० भरलेल्या सिलिंडरची गरज आहे, त्यामुळे आम्ही जागेवर सिलिंडर भरलेले गॅस टाकी देत आहे. कमी सिलिंडरमुळे गाव गावच्या सिलिंडर गाड्या बंद केल्या आहेत. मंगळवार दिनांक ७ एप्रिलपासून भरलेले सिलिंडर उपलब्ध होतील, तसे गावोगावी सिलिंडर टेम्पो पाठवण्याचे नियोजन केले जाईल.- बाळशीराम भालेराव, गॅस डीलर