LPG Gas Crisis : घरपोहोच सिलिंडर मिळेना...; काळ्याबाजारात घरगुती सिलिंडर थेट दोन हजारांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:46 IST2026-03-15T11:45:33+5:302026-03-15T11:46:28+5:30
- जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक कारवाईच्या आदेशानंतरही साठेमारी अन् चढ्या दराने विक्री; गॅस वितरण केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा

LPG Gas Crisis : घरपोहोच सिलिंडर मिळेना...; काळ्याबाजारात घरगुती सिलिंडर थेट दोन हजारांना
पुणे : शहरात गॅस सिलिंडरची साठेबाजी आणि काळ्याबाजाराचे प्रकार सुरूच असून गॅस वितरण एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरात घरगुती सिलिंडर साधारण ९१५ रुपये आहे; परंतु काळ्याबाजारात हेच सिलिंडर २,००० रुपयांना विकले जात आहे; तर व्यावसायिक सिलिंडर ४,००० ते ६,००० रुपयांपर्यंत विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बिबवेवाडी, बालाजीनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, धनकवडी, हडपसर, सिंहगड रस्ता, आदी भागांत गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे काही ठिकाणी तर व्यावसायिक सिलिंडरचा दर दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा व्यावसायिकांचा परवाना निलंबित करण्याचा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसपुरवठा प्रभावित झाला असून आता घरगुती गॅस पुरवठ्यावरही मोठा परिणाम दिसत आहे. व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स अडचणीत आली आहेत; तर घरगुती सिलिंडरसाठी वितरण केंद्राबाहेर रांगा लागत आहेत. गॅस सिलिंडरसाठी १५ दिवस प्रतीक्षा करूनही सिलिंडर मिळत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे कृत्रिम टंचाई, जादा दर आणि अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी पुणे शहरात मध्यवर्ती पेठा तसेच उपनगरांत परिस्थिती कायम असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही नागरिकांनी नाव न घेता गॅस वितरकांच्या अनेक तक्रारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला सांगितल्या.
वितरकांकडून १०० लोकांनाच गॅस सिलिंडरचा पुरवठा
सिंहगड रस्त्यावरील एका गॅस वितरण केद्रांवर सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावल्या आहेत; तर एजन्सीसमोर रांगेत उभा असलेल्या ग्राहकांना केवळ १०० सिलिंडरचे वितरण केले जात आहे. बाकीच्या ग्राहकांना माघारी जावे लागत आहे. यावर एका नागरिकांने, नाव न घेता, सकाळी आठपासून गॅस सिलिंडरसाठी थांबलो असताना रांगेतील प्रथम १०० लोकांना गॅस सिलिंडर देण्यात आले. माझा नंबर नंतर होता, यामुळे मला माघार जावे लागले असल्याचे सांगितले. गॅस सिलिंडरचे १५ दिवस झाले बुकिंग करूनही अद्याप गॅस मिळालेला नाही, असेही त्यांंनी सांगितले .
- घरपोहोच सिलिंडर मिळेना
गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शनिवार असूनही शहरातील विविध भागांतील गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळल्या. यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र असंतोष आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे सांगितले जातेय. मात्र, पुरवठा सुरळीत होत नाही अथवा घरपोहोचही सिलिंडर मिळत नाही. यामुळे वितरकांकडून घरपोच सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे.
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. रोज दहा हजार सिलिंडर वितरण सुरळीत सुरू आहे. ८५ टक्के बुकिंग ओटीपीद्वारे होत असून, २५ दिवसांच्या नियमाने डिलिव्हरी दिली जाते. अफवांवर विश्वास ठेवू नका, साठेबाजी करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत की अत्यावश्यक असलेल्या रुग्णांलये, वसतिगृह, वृध्दश्रम, अनाथश्रम, स्मशाभूमी यांना १०० वितरण करण्यात येणार आहे, तर उपहारगृह, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस व तुरंग आदींना ५० टक्के पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
आम्ही रात्रंदिवस काम करून घर चालवितो, आता गॅससाठी कामावर सुटी टाकून रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू. - त्रस्त गृहिणी.
गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुणे शहरातील उद्योग बंद पडू लागतील. हॉटेल व्यावसायिकांवर संकट आले आहे. उपहारगृहाला ५० टक्के पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे. हॉटेलचालक सुरक्षित राहावेत यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि या निर्णयाची अंमलबजावणी करावी. - गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे-रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोसिएशन.
शहर व उपनगरातील नागरिक घरगुती गॅससाठी केंद्रावर गर्दी केली जात आहे. यावर गॅस वितरकांकडून ग्राहकांची पिळवणूक सुरू आहे. नागरिकांना घरगुती गॅससाठी रांगेत थांबावे लागत आहे. वस्ती, झोपडपट्टी भागातील नागरिकांना काम धंदा सोडून वितरण केंद्रावर तासनतास थांबावे लागत आहे. - गणेश शेरला, अध्यक्ष, एकता प्रतिष्ठान गुलटेकडी.