कोरोनाची दहा महिन्यांतली नीचांकी संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:24+5:302021-02-05T05:02:24+5:30

गाफील राहू नका : पुण्यात गेल्या दहा महिन्यांतील नीचांकी रुग्णसंख्या कोरोनाची एंडेमिक फेज : तरी गाफील राहू नका लोकमत ...

The lowest number of corona in ten months | कोरोनाची दहा महिन्यांतली नीचांकी संख्या

कोरोनाची दहा महिन्यांतली नीचांकी संख्या

गाफील राहू नका : पुण्यात गेल्या दहा महिन्यांतील नीचांकी रुग्णसंख्या

कोरोनाची एंडेमिक फेज : तरी गाफील राहू नका

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लसीकरणाला झालेली सुरुवात, कोरोनाबाधित रुग्णांची आटोक्यात येणारी संख्या यामुळे सध्या दुहेरी दिलासा मिळाला आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही २००० पर्यंत खाली आली आहे. सोमवारी शहरात गेल्या दहा महिन्यांमधील ९८ इतकी नीचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. कोरोनाची ‘एंडेमिक फेज’ जवळ आल्याचा अंदाजही बांधला जात आहे. सध्याची परिस्थिती काहीही असली तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार होत नाही तोवर गाफील न राहण्याचे आवाहन केले जात आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक देशाने अनुभवला. पुण्यातील दररोजची रुग्णसंख्याही २००० पर्यंत पोहोचली होती. विशेषत: गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे सगळेच जण धास्तावले होते. या परिस्थितीचा नेटाने सामना सुरु असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली.

डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञांकडून तसेच शासकीय यंत्रणेकडूनही वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात कोरोनाच्या संसर्गाचा वेग आणि प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा कमी झालेला आलेख स्थिरावल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. मात्र, कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत कोणताच अंदाज बांधणे शक्य नसल्याचाही एक मतप्रवाह आहे.

चौकट

“विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या कोव्हिड १९ नॅशनल सुपर मॉडेल एक्सपर्ट समितीने फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोनाची ‘एंडेमिक फेज’ येण्याचा अंदाज नोव्हेंबर महिन्यातच व्यक्त केला होता. युरोपातील दुसरा उद्रेक लक्षात घेता भारतानेही दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधून त्यादृष्टीने तयारी केली. विषाणू वेगाने रुप बदलत असल्याने त्यादृष्टीने यंत्रणाही सतर्क राहणे आवश्यक असते.”

- डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी

चौकट

“कोरोना आटोक्यात आला आहे असे आजही म्हणता येणार नाही. कोणत्याही विषाणूच्या संसर्गामध्ये वरचा बिंदू आणि खालचा बिंदू असतो. कोरोना सध्या खालच्या बिंदूवर आहे. सक्रिय रुग्णांची संख्या नगण्य होत नाही तोवर साथ आटोक्यात येऊ शकत नाही. नागरिकांनी निष्काळजी राहू नये.”

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य

Web Title: The lowest number of corona in ten months