न्हावरे : आंधळगाव (ता.शिरुर) येथील वडाच्या तळ्यात बकरी धुताना मेंढपाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३३ रा.पांढरेवस्ती, आंधळगाव ता.शिरुर) असे मृत्यू झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद दादा सखाराम पांढरे यांनी मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्र केंद्रात दिली आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे, मयत साहेबराव चांगदेव पांढरे आणि त्याचे चुलत बंधू दादा सखाराम पांढरे व अण्णा सखाराम पांंढरे हे तिघे जण आंधळगाव येथील वडाच्या तळ्यात बकरी धुण्यासाठी गेले होते. तळ्याच्या कडेला साहेबराव पांढरे बकरी धूत असताना, अचानक तळ्याच्या पाण्यात बुडाला. साहेबराव पाण्यात बुडाला असल्याचे लक्षात येताच, दादा पांढरे व अण्णा पांढरे यांनी पाण्यात बुड्या मारून त्याचा शोध घेतला. मात्र, तो त्यांना सापडला नाही. त्यानंतर, दादा पांढरे यांनी येथील शेतकरी सतीश आबा ठोंबरे यांना बोलावून घेतले. सतीश ठोंबरे यांनी पाण्यात बुडी मारून साहेबराव पांढरे याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर, साहेबराव पांढरे यांना पुढील उपचारासाठी न्हावरे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, साहेबराव पांढरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साहेबराव पांढरे यांना पोहता येत नसल्यामुळे या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.