Loss of rice crop worth 12 crore in maval areas | मावळातील १२ कोटींच्या भात पिकाचे नुकसान

मावळातील १२ कोटींच्या भात पिकाचे नुकसान

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे सादरभरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी 

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५ हजार ४३६.७९ हेक्टरचे सर्व पंचनामे झाले असून, झालेल्या नुकसानीचे ११ कोटी ९१ लाख रुपये मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी याबाबत माहिती दिली. 
अवकाळी पावसामुळे  मावळ तालुक्यातील १७८ गावांतील १२ हजार ७१४ शेतकऱ्यांचे भात पिकाचे नुकसान झाले होते. २० हजार ४०० रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई  मिळावी, असा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह विविध पक्षांतील शिष्टमंडळाने केली होती. यानंतर कृषी व महसूल खात्याने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने पाठवले. 
मावळ तालुक्यात भात हेच खरिपाचे मुख्य पीक असून यावर्षी १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले. यंदाच्या हंगामात भात पिकाला आवश्यक गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने पीक जोमात आले होते. यावर्षी भाताचे उत्पन्न चांगले येईल, या आशेवर शेतकरी आनंदात होता. परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात ९२० हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले.
.........
शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला 
१मावळ परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामेदेखील करण्यात आले होते. जे पीक शेतात राहिले, त्यावर शेतकऱ्यांनी समाधान मानले. परंतु ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस सुरू राहिल्याने या पिकाचे पुन्हा नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला. भरपाई कधी मिळणार याबाबत प्रतिक्षा आहे.
........
भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी 
परतीच्या पावसाचा मावळ तालुक्यात मुक्काम लांबला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळेही शेतकरी हवालदिल झाले होते. भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. परंतु सदरची रक्कम कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Loss of rice crop worth 12 crore in maval areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.