The loss revenue of railways due to trains closed | रेल्वेचा बुडतोय कोटींचा महसुल
रेल्वेचा बुडतोय कोटींचा महसुल

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे मागील दोन आठवड्यांपासून रेल्वेची वाहतूक विस्कळीत डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणी, सिंहगड, डेक्कन व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांसह काही गाड्या रद्द

पुणे : दरड कोसळल्यामुळे मागील नऊ दिवसांपासून पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या  सहा इंटरसिटी एक्सप्र्रेस रद्द केल्या आहेत. परिणामी, या गाड्यांपासून दररोज मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. या गाड्या दि. १६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याने तोपर्यंत रेल्वेचा चार कोटी रुपयांचा महसुल बुडणार आहे. 
मुसळधार पावसामुळे मागील दोन आठवड्यांपासून रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ३ ऑगस्ट रोजी मंकी हिलजवळ मोठी दरड कोसळल्याने पुणे-मुंबईदरम्यानची वाहतुक ठप्प झाली आहे. काही दिवसात ही वाहतुक सुरळीत होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना होती. पण दरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी विलंब लागत आहे. परिणामी, डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणी, सिंहगड, डेक्कन व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांसह लांबपल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्ग वळविले आहेत. त्यामुळे पुणे विभागाचा दररोज कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडत आहे. 
डेक्कन क्वीनला पुण्याहून मुंबईकडे गेल्यास त्यातून रेल्वेला सुमारे अडीच लाख रुपयांचा महसुल मिळतो. तेवढाच महसुल ही गाडी पुण्याला परतल्यानंतर मिळतो. दोन्ही शहरांदरम्यान लांबपल्याच्या गाड्या वगळून दररोज सहा एक्सप्रेस धावतात. या गाड्यांमधूनही रेल्वेला प्रत्येकी सरासरी अडीच लाख रुपये मिळतात. या गाड्यांचा दररोजचा सरासरी महसुल ३० लाखांवर जातो. ४ आॅगस्टपासून या गाड्या बंद आहेत. याचा विचार केल्यास दररोज सुमारे ३० लाख रुपयांचा महसुल बुडत आहे. या गाड्या शुक्रवार (दि. १६) पर्यंत रद्द आहेत. तोपर्यंत या १३ दिवसांमध्ये रेल्वेला सुमारे ३ कोटी ९० लाख रुपयांचा महसुल मिळणार नाही. या इंटरसिटी गाड्यांप्रमाणे पुणेमार्गे मुंबईला जाणाऱ्या कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्सप्रेससह लांब पल्याच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्यांचे सुटण्याच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे. त्यापासून मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेचा दररोज कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडत आहे.  

......
डेक्कन क्वीनच्या एका फेरीतून सुमारे पाच लाख रुपयांचा महसुल मिळतो. इतर गाड्यांचा महसुलही जवळपास एवढाच आहे. एवढ्या दिवस गाड्या बंद राहिल्याने पुणे विभागाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बडत आहे. रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
- सुरेशचंद्र जैन, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
........
मुंबई ते पुण्यादरम्यानच्या माल वाहतुकीलाही फटका बसला आहे. मात्र, ही वाहतुक अत्यल्प आहे. रेल्वेकडे येणारा माल दोन प्रकारचा असतो. लगेच खराब होणारा माल रेल्वे थांबवून ठेवत नाही. इतर मार्गाने हा माल तातडीने पाठविला जात आहे. तर इतर मालही उपलब्ध गाड्यांमधून पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे माल वाहतुकीवर फारसा परिणाम होऊ दिलेला नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस - 
डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस एका गाडीचा रोजचा बुडीत महसुल-सुमारे पाच लाख रुपये सहा गाड्यांचा रोजचा बुडीत महसुल-३० लाख रुपये १३ दिवसांचा बुडीत महसुल-३ कोटी ९० लाख रुपये

Web Title: The loss revenue of railways due to trains closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.