कर्वे नगरमध्ये भरदिवसा डोळ्यात मिर्चीची पूड टाकून वाईन शॉपची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:08 IST2017-11-14T16:04:25+5:302017-11-14T16:08:05+5:30
वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून पावणे सहा लाखाची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.

कर्वे नगरमध्ये भरदिवसा डोळ्यात मिर्चीची पूड टाकून वाईन शॉपची रोकड लुटली
पुणे : वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून भरदिवसा पावणे सहा लाखाची रोकड लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले आहे. ही घटना कर्वेनगर रस्त्यावरील ताथवडे उद्यानासमोर सोमवारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६, रा. प्रसाद बिबवेनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश परदेशी हे एका वाईन शॉपमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवार ते रविवार अशी तीन दिवसांची वाईन शॉपची जमा झालेली ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान ते ताथवडे उद्यानाजवळ आले असता एका व्यक्तीने त्यांना गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांची गाडी थांबवून गाडीवर बसूनच पाठीमागील टायर पंक्चर झाले आहे का याची पाहणी करीत असताना त्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या डोळ्यात लाल मिर्चीची पावडर टाकली आणि त्यांच्या गळ्यात अडकवलेली काळ्या रंगाची रोख रकमेची असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र चोरटा पसार झाला होता.
अलंकार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.