लाेकमत इम्पॅक्ट : पीएमपी अागारप्रमुखांच्या 'रेटकार्ड’ची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 20:38 IST2018-11-03T20:34:10+5:302018-11-03T20:38:17+5:30
काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

लाेकमत इम्पॅक्ट : पीएमपी अागारप्रमुखांच्या 'रेटकार्ड’ची चौकशी सुरू
पुणे : काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणुक करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत.
पीएमपीमध्ये काही आगारप्रमुखांकडून लाईट ड्युटी, फिक्स डुयटी, रजा मंजुरी, वाशिंग सेंटरवर काम, स्टार्टर ड्युटी यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जातात. याबाबत ‘रेट’ निश्चित करण्यात आले आहेत. एका आगार प्रमुखाविरोधात सुमारे ७० हून अधिक कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार केली आहे. याबाबतचे ‘आरामदायी ड्युटीसाठी पीएमपीमध्ये रेटकार्ड’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि. ३१) प्रसिध्द झाले. या वृत्ताने पीएमपी वर्तुळात खळबळ उडाली. प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत कर्मचाºयांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली आहे.
‘पीएमपी’तील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सदस्यांच्या समितीमध्ये हडपसर आगारामध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे. यावेळी काही कर्मचाऱ्यांचा जबाबही घेण्यात आला आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी तक्रारींवर ठाम राहत आगारप्रमुखांच्या कामावर आक्षेप नोंदविले आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी मात्र तक्रार अर्जावर नजरचुकीने सह्या केल्याचे चौकशीदरम्यान म्हटले आहे. तक्रार अर्जावर ७० हून अधिक कर्मचाºयांच्या सह्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचा याबाबत जबाब घेतला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अद्याप तक्रारींबाबत एकही पुरावा समोर आलेला नाही. आगारप्रमुखांकडून पैसे घेतले जात असले तरी त्याबाबतचे पुरावेही मिळणे आवश्यक आहे.
तीनसदस्यीय समितीची नेमणुक
आगारप्रमुखांकडून पैसे घेतले जात असल्याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तीनसदस्यीय समितीची नेमणुक करण्यात आली आहे.
- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
पुणे महानगर परिवहन महामंडळ