Lohmarg Police Bharti Exam: पुण्यात सुपरवायझरनेच विद्यार्थ्यांना सांगितली उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 21:55 IST2021-10-19T21:26:54+5:302021-10-19T21:55:37+5:30
लोहमार्ग पोलीस भरती परीक्षेत पिंपरी-चिंचवड केंद्रातील दोन शाळांमध्ये सुपरवायझरनेच गुगलवरून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे

Lohmarg Police Bharti Exam: पुण्यात सुपरवायझरनेच विद्यार्थ्यांना सांगितली उत्तरे
पुणे : लोहमार्ग पोलीस भरती परीक्षेत पिंपरी - चिंचवड केंद्रातील दोन शाळांमध्ये सुपरवायझरनेच गुगलवरून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. ज्या केंद्रात असा प्रकार घडला आहे. त्या संबधित सुपरवायझरविरोधात विद्यार्थ्यांनी तक्रार द्यावी. त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी केले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर अशा एकूण ८ ठिकाणी पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा रविवारी (दि. १७) रोजी पार पडली. एकूण ७१ हजार ९७२ जणांनी परीक्षा दिली. मात्र, यातील पिंपरी-चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय आणि वसंतदादा पाटील या दोन केंद्रावर झालेल्या परीक्षेत एजन्सीने नेमलेल्या सुपरवायझरनेच काही विद्यार्थ्यांना गुगल करून संबंधीत प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांकडे करा थेट तक्रार
लोहमार्ग पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत कोणत्याही उमेदवारास कोणत्याही प्रकारची काही तक्रार अथवा आक्षेप असल्यास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करावी. यासाठी विद्यार्थ्यांनी ०२०-२५५४१६३१, ०२०-२५५४१६५६, ९४२२३२७१३०, ९४२२३२७१३१ या क्रमांकावर संपर्क करून तक्रार देता येईल, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले.