महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:33 IST2025-02-05T13:31:42+5:302025-02-05T13:33:59+5:30
आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका पाणीपुरवठा विभागाला दिले

महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे
- हिरा सरवदे
पुणे :पाणी तपासणीमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे निष्पन्न झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील १९ खासगी आरओ प्रकल्पांना महापालिका प्रशासनाने टाळे ठोकले आहे. महापालिका आयुक्तांनी सदर आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार कारवाई केल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती. याशिवाय महापालिकेने शुद्ध पाणी म्हणून पाण्याचे एटीएम उभारणाऱ्या ३० आरओ प्रकल्पामधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी १९ प्रकल्पांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागास संबंधित खासगी टँकर, आरओ प्रकल्पचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने या सर्व १९ आरओ प्रकल्पचालकांना नोटीस देउन या प्रकल्पांना टाळे ठोकले. या प्रकल्पांना नियमावली लावण्यात येणार असून, अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय हे प्रकल्प सुरू करायचे नाहीत, अशी नोटीस संबंधितांना दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले.
अशुद्ध प्रकल्प :
माउली ॲक्वा, लेन नं. ए युगंधर चाकणकर, बालाजी ॲक्वा, रायकर मळा, नांलद ॲक्वा, कोमल ॲक्वा, किरण ॲक्वा, सद्गुरू ॲक्वा, धायरेश्वर ॲक्वा, महादेव मंदिर, धायरेश्वर ॲक्वा, चव्हाण आळी, शिवालय ॲक्वा, कोरडे बाग, जलधारा ॲक्वा २, नीलेश करंजकर ॲक्वा, किशोर पिंपळकर ॲक्वा, विजय कोल्हे ॲक्वा, सागर कोल्हे ॲक्वा, मोहन कोल्हे ॲक्वा, चव्हाण वस्ती गल्ली नं. १.