स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद
By राजू इनामदार | Updated: January 14, 2025 17:18 IST2025-01-14T17:17:23+5:302025-01-14T17:18:05+5:30
मागील काही दिवसांपासून ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो, यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झालाय

स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद
पुणे: नव्या तंत्रज्ञानाच्या ॲप आधारित व्यवसायामुळे मूळ स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात असल्याच्या कारणावरून लाकूडबाजारातील स्थानिक टेम्पोचालकांनी मंगळवारी आपली टेम्पोवाहतूक गुरूवारी एक दिवस बंद ठेवली. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी टेम्पोचालकांच्या वतीने व्यापाऱ्यांकडे दाद मागितली. अंगमेहनती कष्टकरी समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
शहरातील लाकूड बाजारात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक टेम्पोचालक व्यवसाय करत आहेत. व्यापाऱ्यांकडे लाकूड व फर्निचरसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी झाली की टेम्पोमधून तो माल संबधित काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहचवला जात असे. मागील काही दिवसांपासून मात्र यासाठी ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो. यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. त्या सर्वांनी एकत्र येत मंगळवारी सकाळी हा बंद पुकारला.
डॉ. आढाव यांनी यावेळी सरकारवर टीका केली. ते स्वत: रोजगार देत नाहीत व जो रोजगार आम्ही निर्माण करतोय त्याला संरक्षणही देत नाही. मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुना मर्चंट चेंबर आणि हमालपंचायत मध्ये गेले अनेक वर्ष नियमितपणे करार चालू आहे. यामुळे कधीही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं नाही. मग टिंबर मार्केट मधील व्यापारी का संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत ? टेम्पो चालक व हमालांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा डॉ. आढाव यांनी दिला.
टिंबर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रतनशेठ किराड यावेळी उपस्थित होते. त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली. टेम्पो पंचायतीचे समन्वयक ओंकार मोरे यांनी टेम्पो पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर केले. यावेळी टिंबर मार्केट टेम्पो पंचायतीचे भरत गेडेवाड , मनोज कांबळे, मुबारक शेख, हनुमंत खंदारे, रंजीत परदेशी, सचिन खरात, सुदाम गायकवाड, शरद रणसिंग विशाल कांबळे, आरिफ मुलाणी उपस्थित होते.
अनेकांनी कर्ज काढून टेम्पो घेतले आहेत. त्याचे हप्ते असतात. ते थकले आहे. लाकूड बाजारात व्यवसायाची हमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकही यात आहेत. कष्टकरी वर्गाची टेम्पो पंचायत संघटना आहे. संघटनेच्या सदस्यांनी व्यापारी वर्गाबरोबर संवाद साधून त्यांना स्थानिकांनाच काम देण्याची मागणी केली, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने बंद पुकारावा लागला. - नितीन पवार, निमंत्रक, अंगमेहनती कष्टकरी समिती