राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:09 IST2025-02-17T13:09:15+5:302025-02-17T13:09:35+5:30
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपले अंतिम म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे, आता केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
पुणे : राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ज्या-ज्या बाबींची पूर्तता करण्यास सांगितले होते, त्या बाबींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे न्यायालय लवकरच निवडणूक आयोगाला आदेश देईल आणि लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी पुण्यातील घरकुल लॉन्स येथे बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये संघटन पर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपले अंतिम म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले की आम्ही तातडीने निवडणुका घेऊ. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल,’ असे बावनकुळे म्हणाले.
‘आमचे सरकार योजना बंद करणारे नसून नवनव्या योजना मांडणारे सरकार आहे. आम्ही प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थशीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. जे पात्र नाहीत किंवा ज्यांना योजनेच्या लाभाची गरज नाही, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे, असे आमचे आवाहन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना गॅसवरील अनुदान सोडून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्हीही आवाहन करू, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला २१ उमेदवार दिले. त्यातील ११ निवडून आले. आम्ही त्यांना उमेदवार देऊन सहकार्य केले. राज्यात डबल इंजिन सरकार आले पाहिजे, एवढाच आमचा उद्देश होता, असेही बावनकुळे म्हणाले.
धस-मुंडे भेटीवर मौन
‘बीडप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी मौन धारण केले.