Pune: खूनप्रकरणी एकाला जन्मठेप, मोबाइल चोरास दीड वर्षे शिक्षा; घोरपडे पेठ परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 20:02 IST2024-04-17T20:00:14+5:302024-04-17T20:02:15+5:30
मृताच्या आसपासची टेहळणी करून कचरू याचा मोबाइल चोरून नेल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे...

Pune: खूनप्रकरणी एकाला जन्मठेप, मोबाइल चोरास दीड वर्षे शिक्षा; घोरपडे पेठ परिसरातील घटना
पुणे : गाडीवरून सोडण्यासह पैसे मागितल्याच्या कारणावरून ३१ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने अश्विन विकास गवळी (वय २०, रा. विघ्नहर्ता नगर, आंबेगाव पठार) यास जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, मृताचा मोबाइल चोरून नेणाऱ्या मोहम्मद रिजवान अन्सारी (वय ३५, मूळ रा. उत्तर प्रदेश) यास दीड वर्षे साधी कैद व 3 हजार रुपये दंड सुनावला. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
ही घटना ४ जून २०१८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोरपडे पेठ परिसरात घडली. कचरू गणपत गवळी (वय ३१) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी, सहायक पोलिस निरीक्षक जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी कचरू आणि अश्विन यांमध्ये वाद झाले. त्या कारणावरून अश्विन याने कचरू याला मारहाण करीत दुचाकीवर बसवून स्वारगेट परिसरात आणले. त्यानंतर, पुन्हा भांडण करत जवळ असलेल्या धारदार चाकूने कचरू याच्या पोटात वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तसेच, खुनाच्या घटनेनंतर अन्सारी घटनास्थळी आला.
मृताच्या आसपासची टेहळणी करून कचरू याचा मोबाइल चोरून नेल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी कामकाज पाहिले. तपासी अंमलदार म्हणून पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रमोद धिमधिमे यांनी काम पाहिले.