आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:29 IST2025-11-17T13:28:20+5:302025-11-17T13:29:16+5:30
बिबट्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी
अवसरी : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर चांगलीच डोकेदुखी ठरत असून, आता हा वन्य प्राणी थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. वाडी–वस्ती भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर, विशेषत: शेळ्या, मेंढ्या आणि वासरांवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. अंधारातच नाही, तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बिबट्या घराच्या दारापर्यंत दिसू लागल्याने, ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत आंबेगाव, तसेच शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका आजीवर प्राणघातक हल्ला केल्याचीही दुःखद घटना घडली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने दिवसाही बिबट्या फिरताना पाहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी आणि महिलांना हिरवा चारा, मका, गाजर गवत कापताना जीव मुठीत धरावा लागतो. पहाटेच्या वेळी पाणी भरण्यासाठी शेतात जाताना किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यावरून घराकडे परतताना अनेकदा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने, ग्रामस्थांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे काही शेतकरी आपली गायी-म्हशी विकण्यासही भाग पडले आहेत. कुटुंब व पशुधनाच्या सुरक्षेसाठी आता तारेच्या जाळीचे कंपाउंड करणे हा पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे आणि अनेकांनी तो स्वीकारलाही आहे.