पाषाणमध्ये बिबट्याचे मॉर्निंग वॉक, वन विभागाला पत्ताच नाही..! नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:36 IST2025-12-06T16:35:45+5:302025-12-06T16:36:39+5:30

- शिवनगर परिसरात पाषाण तलावाजवळ बिबट्या दिसल्याचे काही लोकांनी सांगितले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. पण, काही आढळून आले नाही.   

Leopard's morning walk in Pashan, Forest Department has no clue..! Citizens are deeply upset | पाषाणमध्ये बिबट्याचे मॉर्निंग वॉक, वन विभागाला पत्ताच नाही..! नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पाषाणमध्ये बिबट्याचे मॉर्निंग वॉक, वन विभागाला पत्ताच नाही..! नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

औंध : औंध आरबीआय क्वॉर्टरमध्ये रविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी बिबट्याने पहाटे ३:५० वा. मॉर्निंग वॉक केले. तेथून तो सिंध कॉलनीमधून पसार झाला. वन विभागाच्या दोन टीमने या भागात मोठी तपासणी मोहीम राबवली, यात हाती काहीच लागले नाही. त्यानंतर बरोबर १२ दिवसानंतर शुक्रवारी (दि.५) पहाटे ३:५४ वा. पाषाण सुतारवाडी येथे प्रियोगी प्लाझा सोसायटी येथे बिबट्या येऊन गेला. तसेच, मुक्ता रेसिडेन्सी समोरून पहाटे ४:१२ वा. सहज चालत शिवनगरकडे गेला, तरीही वन विभागाला माहिती मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाबाबत नाराजी निर्माण झाली आहे.

वन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवनगर परिसरात पाषाण तलावाजवळ बिबट्या दिसल्याचे काही लोकांनी सांगितले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. पण, काही आढळून आले नाही.   

औंधमध्ये पहाटे ३:५० वा., तर पाषाण सुतारवाडीमध्ये पहाटे ३:५४ वा बिबट्या दिसतो. ही वेळ बिबट्याची माहीत असताना वनाधिकारी त्या वेळेत का थांबत नाहीत. नागरिकांना तो सीसीटीव्हीमध्ये दिसतो. मग वन विभागाला का दिसत नाही, ते परिसरात फिरून नक्की चौकशी करतात का, असा प्रश्न नागरिक करत आहेत.                        

बिबट्या मांजारवर्गीय हिंस्रप्राणी असल्याने तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडतो, तर माणसे झोपेतून उठण्याच्या आत आपल्या ठिकाणी परत जातो.             पाषाण टेकडी, वेताळ टेकडी या डोंगरावर मोठे पठार आहे. पूर्वी येथे भरपूर गवत होते. त्यामुळे ससे व हरिणांचे कळप सहज टेकडीवर फिरायला गेल्यावर समोरून जात असत. टेकडीवर वन विभाग व संरक्षण खात्याने स्वतःच्या जागेत भिंती बांधून परिसर बंदिस्त केला. पर्यावरण विषय न कळणारे सुशिक्षित लोक त्यांचे सल्लागार झाले. गवताळ प्रदेश नष्ट करून झाडांकरिता जागा सपाट करण्यात आली. त्यासाठी दरवर्षी गवत जाळण्यात येते. गवत जाळल्याने तेथील सशासारखे लहान प्राणी व पक्षी मरण पावतात. गवतावर गुजराण करणारे ससे व हरिणांची संख्या कमी झाली. शिवाय बंदिस्त भिंतीत ससे व हरिणांची बेकायदेशीर शिकार होते. त्याची कोठे तक्रार होत नाही, कारण तेथे इतर व्यक्ती जाऊ शकत नाहीत. त्यासाठी सरकारने संबंधित ठिकाणी बदलीचे नियम योग्य रीतीने पाळले जातात का, याची पाहणी करणे आवश्यक आहे. 

मी पहाटे ३:३० वा. उठतो व सोसायटी समोरील भाग झाडून घेतो. त्यानंतर एक चारचाकी वाहन धुण्याचे काम करतो. चारचाकी धुतल्यानंतर मी गेट लावून आत आल्यावर मला गेटचा मोठा आवाज ऐकू आला. मी आवाज दिला कोण आहे रे. बाहेर वाॅचमन उभा होता, त्याला विचारले गेट कोणी वाजविले, त्याने सांगितले आतमध्ये बिबट्या गेला आहे. मला ते खोटे वाटले, तरीही मी काठी घेऊन आलो व काठी वाजवत सर्व बाजूला फिरलो. त्यानंतर चेअरमन यांना सांगितले. - वीर बहादुर खडका, वॉचमन, प्रियोगी प्लाझा सोसायटी, सुतारवाडी 
 

वॉचमनने मला सांगितल्यानंतर मी बाहेरच्या दुकानदारांना सांगितले व आम्ही सीसीटीव्ही चेक केले, तेव्हा ३:५४ वाजता बिबट्या गेटमध्ये आला व भिंतीवरून परत बाहेर गेल्याचे दिसले. त्यानंतर आम्ही पोलिस व वन विभागाला कळविले.  - लक्ष्मण चव्हाण, चेअरमन, प्रियोगी प्लाझा सोसायटी, सुतारवाडी पाषाण

प्रियोगी प्लाझाच्या गेटवरील केस ताब्यात घेण्यात आले आहेत ते बिबट्याचेच आहेत. गेट वरून उडी मारताना तो जखमी झाला असावा. नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये. - चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे

Web Title: Leopard's morning walk in Pashan, Forest Department has no clue..! Citizens are deeply upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.