Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:56 IST2025-11-11T13:56:45+5:302025-11-11T13:56:58+5:30
बिबट्या आता गावच्या वेशिवर आला असल्याने वनविभागाने अवसरी बुद्रुक गावात सुद्धा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे

Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावडेवाडी येथील पिंपळमळा व बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ सोमवारी रात्री आठ ते बाराच्या दरम्यान दोन बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी दिली. जेरबंद बिबट्याची डरकाळी पाहून थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही बिबट्यांचे वय दीड वर्ष असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वनरक्षक शिवचरण मॅडम, वनविभागाचे बिबट शीघ्र कृती दल यांच्या सांगण्यावरून वनविभागाने पिंपळमळा वस्ती व बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ पिंजरा लावला होता. या ठिकाणी दिवसा बिबट्या फिरताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले होते त्यामुळे प्रथम एक पिंजरा पिंपळमळा येथे लावला होता. सोमवारी रात्री आठच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला त्या बिबट्यास पेठ अवसरी घाटात नेऊन दुसऱ्या पिंजऱ्या ठेवले व पुन्हा तोच पिंजरा बैलगाडा शर्यतीच्या गाठाजवळ आणून लावण्यात आला. रात्री साडेअकरा वाजता पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद झाला. दोन्ही बिबट्यांचे वय दीड वर्ष असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी सांगितले.
बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे#Pune#ambegaon#leopardpic.twitter.com/qFnfc8vpIm
— Lokmat (@lokmat) November 11, 2025
दरम्यान अवसरी बुद्रुक कुंभारवाड्यातील भर वस्तीत अमोल हिंगे पाटील यांच्या पडक्या घरात रविवारी रात्री बिबट्या लपून बसला होता. या बिबट्याने अमोल हिंगे पाटील यांची शेळी मारून टाकली आहे. बिबट्या आता गावच्या वेशिवर आला असल्याने वनविभागाने अवसरी बुद्रुक गावात सुद्धा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, जारकरवाडी, वळसेमळा आदी गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाल्याने वन विभागाने तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.