पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:41 IST2025-11-09T18:40:36+5:302025-11-09T18:41:22+5:30
बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो, अशा प्रसंगी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये म्हणून ग्रामस्थांनी नवी शक्कल लढवली

पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
पुणे : उत्तर पुणे जिल्हा म्हणजे जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड या भागात बिबट्याची प्रचंड दहशत सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. परंतु रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबट कधी कुठे निदर्शनास येईल याचा नेम नाही. त्यामुळे त्या तालुक्यांच्या गाव वाडीवस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे. अशातच स्वरक्षणासाठी महिलांवर गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ आली आहे. शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड भागातील महिलांनी ही नवी शक्कल लढवली आहे.
पुणे जिल्ह्याच्या या तालुक्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या बिबट्यापासून स्वतःच स्वरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टाचं घातला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतोय. अशा प्रसंगी शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा थेट गळ्यात घातला आहे. शेत हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतलाय. सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरतंय, त्यामुळं बळीराजावर टोकदार खिळ्यांचे पट्टे परिधान करण्याची वेळ आलीये. जे खरंच लाजिरवाणे आहे.
मागील दोन वर्षापासून आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले होऊन शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुत्रे असे पाळीव प्राणी त्याचे भक्षक झाले आहेत. त्याचप्रमाणे माणसे, महिलांवर हल्ले करून त्यांनाही ठार केले आहे. आता तर बिबट्या लहान मुलांनाही लक्ष्य करू लागले आहेत. पिंपरखेडच्या रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन केले. अखेर वनविभागाने त्या बिबट्याला ठार केले. सर्व ठिकाणी ग्रामस्थ वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. वन विभागाकडून पिंजरेही लावले जातात परंतु त्यामध्ये भक्षाचा अभाव तसेच बिबट्या पिंजऱ्यामध्ये न येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. म्हणून बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तरी पाळीव प्राणी यांच्यावर होत असलेले हल्ले वाढलेले आहेत. मनुष्यहानी होऊ नये म्हणून वन विभागाने त्वरित काळजी घेऊन बिबट्यासाठी पिंजरा लावावा ही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.