जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:19 IST2025-10-04T11:19:44+5:302025-10-04T11:19:59+5:30
परिसरात पिंजरे लावून गस्त वाढवावी, शाळा-विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला शुक्रवारी (दि. ४ ऑक्टोबर) रात्री पावणे आठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या रस्त्यावरून दोन मोटरसायकलीवर प्रवास करणाऱ्या तिघा व्यक्तींवर एका मादी बिबट्याने हल्ला केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर-चिल्हेवाडी रस्त्यावरील शेटेवाडी पाटाजवळील परिसरात ही घटना घडली. त्या ठिकाणी एका मादी बिबट्याने आपल्या दोन बछड्यांसह वास्तव्य केले असल्याचे स्थानिक सांगतात. रात्रीच्या वेळी मोटरसायकलने जात असताना या मादीने अचानक झडप घालत हल्ला केला. पहिल्या मोटरसायकलवरील डालचंद्र लेखराज सिंग (वय ४०, रा. ओतूर) हे जखमी झाले, तर दुसऱ्या मोटरसायकलवरील लक्ष्मण बबन गोंदे (वय ३७, रा. गोंदेवाडी) आणि ईश्वर रामदास जाधव (वय ४३, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत करून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले या घटनेनंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वनविभागाने तत्परतेने येऊन यावेळी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले. सुदैवाने तिघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे मोठे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शेटेवाडी परिसरात बिबट व त्याचे बछडे वारंवार दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर परिसरात पिंजरे लावून गस्त वाढवावी, तसेच शाळा-विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. संपूर्ण घटनेमुळे ओतूर व परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ आता वनविभागाच्या तत्काळ कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.