हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:30 IST2025-11-15T11:29:23+5:302025-11-15T11:30:02+5:30
परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण
हडपसर: शेवाळवाडी येथे भरदिवसा भवरा वस्ती येथे बिबट्या नागरिकांना दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केल्यावर वन विभागाच्या वनरक्षक प्रिया अंकेन व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. याबाबत लवकरच उपाययोजना करू, असे आश्वासन वन विभागाने दिले आहे.
फुरसुंगी परिसरात मागील तीन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. गुरुवारी (दि.१३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी येथे भवरा वस्ती या ठिकाणी बिबट्या रस्त्याने जाताना दिसला. एका स्थानिक कारचालकाने आपल्या मोबाइलमधून फोटो काढला. हा फोटो परिसरात काही क्षणांत व्हायरल झाला.
भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी हडपसर पोलिस ठाण्याचे प्रमुख संजय मोगले यांना व पुणे वनपाल शीतल खेंडके यांना तातडीने घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच मांजरीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे विजयकुमार ढाकणे व त्यांचा सर्व कर्मचारी तसेच वनरक्षक प्रिया अंकेन यांनी भवरा वस्ती या ठिकाणी भेट देऊन बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात पाहणी करून त्याचे ठसे मिळविले. बिबट्या या परिसरात आहे याची खात्री पटल्यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून तातडीने कॅमेरे लावून आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी यावेळी वन अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. हा बिबट्या आता द्राक्ष बागायतदार संघाच्या परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती तेथील महिला कामगारांनी दिली. तसेच रात्री ११ वाजता हिंगणे वस्ती या ठिकाणीही काही महिलांनी हाच बिबट्या पाहिला होता. या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.