ओतूर येथे बिबट्याचा थरार! प्रगतशील शेतकरी सोमनाथ ठिकेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:01 IST2025-12-03T21:01:32+5:302025-12-03T21:01:32+5:30
आवाजामुळे बिबट्या काही क्षण रस्त्यावर थांबला आणि नंतर पुन्हा उसाच्या शेतात पसार झाला.

ओतूर येथे बिबट्याचा थरार! प्रगतशील शेतकरी सोमनाथ ठिकेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव
लोकमत न्यूज नेटवर्क, ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास अमीर घाट परिसरात प्रगतशील शेतकरी सोमनाथ किसन ठिकेकर (वय ५२) यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घालून हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सोमनाथ ठिकेकर हे मोटारसायकलवरून घरी जात असताना उसाच्या शेतातून बिबट्याने झेप घेत थेट त्यांच्या दिशेने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते मोटारसायकलवरून खाली पडले. मात्र ठिकेकर यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या आवाजामुळे बिबट्या काही क्षण रस्त्यावर थांबला आणि नंतर पुन्हा उसाच्या शेतात पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. पत्रकार महेश घोलप, अविनाश घोलप, सुधाकर मुंढे यांनी तत्परतेने ठिकेकर यांना उचलून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती वनविभागाकडून समोर आली आहे.
घटनेनंतर वनविभागाचे वनपाल विश्वनाथ बेले व फुल खंडागळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, अमीर घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून योग्य त्या उपाययोजना करून बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यात येईल. तसेच रेस्क्यू टीम तातडीने दाखल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात वनविभागाकडून गस्त वाढवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सतत वाढणाऱ्या बिबट्याच्या हालचालीमुळे सुरक्षा उपाययोजनांची मागणीही तीव्र झाली आहे.