आंबेगावात पुन्हा बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; तरुणी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:32 PM2023-11-17T14:32:37+5:302023-11-17T14:33:06+5:30

दिवाळीनिमित्ताने फटाके वाजवले जात असून घाबरून बिबटे बाहेर पडून हल्ला करत असल्याचे वनविभाग अधिकारी यांनी सांगितले

Leopard attacks bike again in Ambegaon Young woman injured | आंबेगावात पुन्हा बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; तरुणी जखमी

आंबेगावात पुन्हा बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; तरुणी जखमी

मंचर: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर खुर्द गावच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. सदर महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला बिबट्याचा दात लागला असून तिला उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. चांडोली खुर्द येथे बिबट्याने दुचाकीस्वरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काठापूर बुद्रुक येथे घडलेल्या या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.

दीपावली निमित्त फटाके वाजवले जात असून त्यामुळे घाबरून बिबटे बाहेर पडून हल्ला करत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली. चांडोली खुर्द येथे दुचाकी वरून जाणाऱ्या पती-पत्नी व मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काठापूर बुद्रुक येथे ओझर रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर जयश्री पंकज करंडे व त्यांचा भाचा ओम एरंडे हे पारगाव येथुन काठापूर बुद्रुक येथे आपल्या घरी जात होते. बारवेचा ओढा या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकलवर हल्ला केला. यामध्ये जयश्री पंकज करंडे यांच्या पायाला बिबट्याचा दात लागला असून बिबट्याच्या हल्यामुळे मोटरसायकलवरुन त्या पडल्याने करंडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सुरुवातीला पारगाव येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार केले त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथुन पुणे येथे उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. काठापुर परिसरात  बिबट्या मोठ्या प्रमाणात दिसू लागला असुन सध्या उस तोडणी सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बारमाही बागायती असणाऱ्या या भागात व उस क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचेही वास्तव या ठिकाणी जास्त आहे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

 ऊस क्षेत्र तोडणीमुळे कमी होत चालले आहे,ल. त्यामुळे सैरभैर होऊन बिबटे वारंवार नागरिकांना दिसत असतात. पाळीव कुत्रे,पाळीव प्राणी, लहान वासरावर या बिबट्यांचे हल्ले वारंवार होत असतात. बिबट्या प्राण्यांबरोबरच आता माणसांनावरही हल्ला करू लागला असून माणसांवर हल्ले वाढले आहेत. सलग दोन दिवसातील हा दुसरा हल्ला झाला आहे त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये भितीचे, दहशतीचे वातावरण निर्माण आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनखात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Leopard attacks bike again in Ambegaon Young woman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.