घराच्या बाहेर अभ्यास करत असताना बिबट्याची झडप; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:12 IST2025-09-25T12:11:07+5:302025-09-25T12:12:32+5:30
घराच्या बाहेर बसून अभ्यास करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला उचलून घेऊन गेला, जवळच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला

घराच्या बाहेर अभ्यास करत असताना बिबट्याची झडप; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना
नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील कुमशेत गावाजवळील ठाकर वस्तीवर राहणाऱ्या सात वर्षीय सिद्धार्थ प्रवीण केदार या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, बिबट्यांच्या समस्येचे मुळापासून निराकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी वनविभाग आणि लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला आहे.
२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिद्धार्थ त्याच्या लहान बहिणीसोबत घराबाहेरील ओट्यावर अभ्यास करत होता. त्याची आई घरात स्वयंपाक करत होती, तर शेजारील छपरात शेळ्या बांधलेल्या होत्या. शेळ्यांच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याने अभ्यासात मग्न असलेल्या सिद्धार्थवर अचानक झडप मारली. क्षणार्धात बिबट्याने सिद्धार्थला १५० ते २०० फूट फरपटत उसाच्या शेताकडे नेले. सिद्धार्थच्या बहिणीच्या आरडाओरड्याने आई-वडील आणि शेजारी धावत आले. गावकऱ्यांनी शोध घेतला असता सिद्धार्थच्या हातातून पडलेला पेन आणि वही आढळली. उसाच्या शेतात सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला, त्याच्या मांडीला गंभीर जखमा झाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच सरपंच रवींद्र डोके, पोलिस पाटील मंगेश डोके, वनविभाग आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी तातडीने कारवाई केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर मद्याच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही या महिन्यातील तिसरी घटना आहे. २००१ पासून जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ५२ जणांचा बळी गेला आहे, तर हजारो जण जखमी झाले आहेत. उसासारखा संरक्षक निवारा आणि सहज उपलब्ध भक्ष्य यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे. बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव वनविभागाच्या मंत्रालयीन पातळीवर अंतिम टप्प्यात आहे.