Pune | चांडोली खुर्द गावच्या हद्दीत बिबट्याचा हल्ला; पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:35 IST2023-02-08T18:35:18+5:302023-02-08T18:35:50+5:30

ही घटना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत घडली...

Leopard attack in Chandoli Khurd village limits; Husband and wife injured lying on the road | Pune | चांडोली खुर्द गावच्या हद्दीत बिबट्याचा हल्ला; पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी

Pune | चांडोली खुर्द गावच्या हद्दीत बिबट्याचा हल्ला; पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी

मंचर (पुणे) :बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्यानंतर बिबट्याची दुचाकीला धडक बसून पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी झाले आहे. ही घटना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत घडली. सुदैवाने पती-पत्नी बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील पोपट वाबळे (वय ३०), व त्यांची पत्नी नमिता वाबळे (२६) हे मंचर येथे नोकरी करतात. काल काम उरकून ते दुचाकीवरून घरी निघाले होते. घरी जात असताना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. बिबट्याची धडक दुचाकीला बसली. अचानक झालेल्या हल्ल्यात पती-पत्नी दुचाकीसह रस्त्यावर पडले. गाडीचा झालेला मोठा आवाजामुळे बिबट्या पळून गेला. त्यात रस्त्यावर पडल्याने नमिता वाबळे यांच्या डोक्याला जखम झाली आहे तर पोपट वाबळे यांच्या पायाला, हाताला जखमा झाल्या आहेत.

यावेळी गणेश अभंग व काही स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दोघांना दाखल केले. घटनेची माहिती समजताच वनअधिकाऱ्यांनी रुग्णालयात वाबळे पती-पत्नीची भेट घेऊन विचारपूस केली व हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या रस्त्यावर या अगोदरही अनेकदा दुचाकीचालकांवर बिबट्याने हल्ले केल्याची घटना घडली असून पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Leopard attack in Chandoli Khurd village limits; Husband and wife injured lying on the road