- सुनील भांडवलकर
कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षलागवड, उसाचे वाढते क्षेत्र, वर्षभर उपलब्ध असलेले पाणी व मुबलक खाद्यसाठा यामुळे हा परिसर हळूहळू वन्यप्राण्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेला शिरूर आज मोर, लांडोर, रानडुक्कर, कोल्हा, हरीण, ससे, तरस, लांडगा, विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, तसेच कोरेगाव भीमा परिसरातील माळरानावर आढळणाऱ्या विविध जातींच्या फुलपाखरांमुळे जैवविविधतेने समृद्ध होत आहे. मात्र, याचबरोबर बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत चालला आहे.
भामा आसखेड, चासकमान, घोड, डिंभे धरणांसह भीमा, भामा, इंद्रायणी, वेळ, घोड नद्या, तसेच कालव्यांमुळे शिरूर तालुक्यात वर्षभर पाण्याची उपलब्धता आहे. जवळपास शंभर टक्के क्षेत्र ओलिताखाली आल्याने नैसर्गिक परिसंस्था टिकून राहिली असून डोंगराळ भाग, नदीकाठ व माळरानांमध्ये वन्यप्राण्यांना मुबलक अन्न व पाणी मिळत आहे. परिणामी शिरूर तालुका हळूहळू वन्यप्राण्यांचे ‘माहेरघर’ बनत आहे.
विशेषतः बेट भाग, वढू, कोरेगाव भीमा, रांजणगाव, करडे, कण्हेरगाव, पिंपळसुटी, न्हावरा, मांडवगन व परिसरात बिबट्यांच्या हालचाली लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना शेतात बिबट्यांचे दर्शन झाले असून पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी बिबट्याच्या मानवी हल्ल्यात नागरिकांना जीव गमवावा लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मानव-बिबट संघर्ष लक्षात घेऊन जुलै २०२४ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सविस्तर कृती आराखडा तयार केला होता. त्यावर २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शिक्कामोर्तब करून बिबट आपत्ती प्रवण २३३ गावांमध्ये उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोळा महिने उलटूनही या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तर या आराखड्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास दररोज बिबट हल्ल्याच्या घटना घडत असताना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
वनविभागाने नागरिकांना रात्री उघड्यावर जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवावीत तसेच वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे. शाळा व गावपातळीवर जनजागृती कार्यक्रमही राबवले जात आहेत.
निसर्ग पर्यटन केंद्राचा विचार
कोरेगाव भीमा येथील नरेश्वर मंदिरालगतच्या डोंगराळ भागात असलेल्या नैसर्गिक तलावात पाण्याची सोय करून सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान फुलणारी विविध फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पदपथ व सुविधा उभारून निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याचा मानस असल्याची माहिती शिरूर तालुका वन अधिकारी गव्हाणे यांनी दिली.
विविध विभागांसाठी सूचनासार्वजनिक बांधकाम विभाग : रस्त्यालगतचे गवत व झुडपे साफ करून दृश्यमानता वाढवणे, गतिरोधक व माहिती फलक उभारणे.
विद्युत वितरण विभाग : बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करून रात्री शेतात जाणे टाळणे.
कृषी विभाग : उसाऐवजी पर्यायी किफायतशीर पिकांना प्रोत्साहन देणे, तसेच ऊस व हत्ती गवत लागवडीसाठी घर व रस्त्यापासून अंतराबाबत मार्गदर्शक सूचना देणे.
जुन्नर वनपरिक्षेत्रातील धक्कादायक आकडे
(शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड)
२५ वर्षांत बिबट हल्ल्यात ५६ मानवी मृत्यू
मागील ५ वर्षांत २२ मृत्यू
२०२१–२२ : मानव १, पशुधन २३१७
२०२२–२३ : मानव ४, पशुधन ३१३१
२०२३–२४ : मानव ३, पशुधन ३१५६
२०२४–२५ : मानव ९, पशुधन ६८४४
२०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ : मानव ५, पशुधन ११४५
उपाययोजना करण्याची गरज
शिरूर तालुका वन्यप्राण्यांचे माहेरघर बनत असताना मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कागदावरील नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरणाऱ्या उपाययोजनांची नितांत गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
Web Summary : Shriur's biodiversity thrives, yet leopard attacks surge, intensifying human-wildlife conflict. Action plan implementation delayed, fueling public anger. Fatalities & livestock losses rise.
Web Summary : शिरूर की जैव विविधता फलफूल रही है, फिर भी तेंदुए के हमलों में वृद्धि, जिससे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र हो रहा है। कार्य योजना का कार्यान्वयन विलंबित, जनता का गुस्सा भड़का। हताहतों और पशुधन की हानि में वृद्धि।