Leaving science, he went to commerce and came first in the country in CA exam | सायन्स सोडून कॉमर्सला गेला आणि सी ए'च्या परीक्षेत देशात पहिला आला
सायन्स सोडून कॉमर्सला गेला आणि सी ए'च्या परीक्षेत देशात पहिला आला

पुणे : अनेकदा आपण ज्या मार्गावर चालत असतो तो आपल्याला योग्य वाटत असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. एका नव्या वळणावर नशीब आपल्याला नेते आणि आपण आहोत त्यापेक्षाही पुढे जातो. हाच अनुभव घेतलाय सी एच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या रजत राठी याने. विज्ञान शाखेत 12वी पूर्ण करणाऱ्या रजतने अचानक वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि चक्क देशात पहिला आला. 
     मंगळवारी सी ए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात रजतने देशात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. पण विशेष म्हणजे त्याने बारावीपर्यंत सी ए होण्याचा विचारही केला नव्हता. मात्र त्यानंतर केलेल्या कल चाचणीत त्याचा वाणिज्य शाखेचा कल आला आणि त्याने थेट सी ए'चा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला तोही साशंक होता पण अखेर निश्चय केला आणि केलेल्या मेहनतीचे अखेर चीज झाले.
     त्याचे वडील एक मेडिकलच्या दुकानात कामाला आहेत तर आई गृहिणी आहे.  मात्र घरातल्या आर्थिक परिस्थितीचे कोणतेही दडपण न घेता त्याने अभ्यास केला.तो याबाबत सांगतो, मी दररोज तीन तास अभ्यास करायचो. परीक्षेच्या आधी तीन महिने ही वेळ वाढवत सहा तासांपर्यंत नेली. त्यातही सलग अभ्यास न करता तो मधेमधे विश्रांती घेत असे. मात्र अभ्यासात सातत्य राखायला तो यशस्वी झाला. याबाबत तो सांगतो, ' सी ए'ची परीक्षा महाकठीण आहे, १६ तास अभ्यास करावा लागतो असं म्हटलं जातं. मला अजिबात असं वाटत नाही. परीक्षेसाठी अभ्यासक्रम विस्तृत असला तरी त्यातही सगळं करण्यापेक्षा मी स्मार्ट स्टडी केला. जे आवश्यक, महत्वाचं आहे तेवढ्यावर भर दिला. मला वाटतं परीक्षेचा बाऊ करण्यापेक्षा सातत्याने अभ्यास केला तर हीच काय कोणतीही परीक्षा पार करणे अवघड नाही. 


Web Title: Leaving science, he went to commerce and came first in the country in CA exam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.