पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:32 IST2025-12-18T12:32:37+5:302025-12-18T12:32:59+5:30
विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे

पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यामध्ये अन्य पक्षामधील अनेकांनी भाजपचा उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आयात विरुद्ध निष्ठावंतांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजपला उमेदवार यादी जाहीर करताना निष्ठावंत नाराज होणार नाही, याची काळजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. त्याने उमेदवार देताना नेत्यांची दमछाक होणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे २ हजार ५०० इच्छुकांनी अर्ज करून मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे भाजपकडे इच्छुकांची संख्या अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यात ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे. त्या भागात अन्य पक्षातून मोठ्याप्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग होणार आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेल्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळगत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील पाच नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यानंतर अन्य पक्षांतील काही माजी नगरसेवक हे भाजपमधील प्रवेशासाठी ‘वेटिंग’वर आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे.
उमेदवारीच्या यादीत घराणेशाहीला थारा असणार का?
महापालिका निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे इच्छुक म्हणून चर्चेत येऊ लागताच निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक निष्ठावंत हे पक्षांतराच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने सर्वपक्षीय आमदारांची ही घराणेशाही पक्षांच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घराणेशाहीला थारा नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार का?, याबाबत उत्सुकता असणार आहे.
भाजपची आज मुंबईत बैठक, पक्षप्रवेश होण्याची शक्यता
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी यादी ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पुण्यातील प्रमुख भाजप पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश गुरुवारी (दि. १८) किंवा शुक्रवारी (दि. १९) मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांचे पुत्र हेमंत बागूल, शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासह सुमारे २२ जणांचा समावेश आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्या !
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी सोशल मीडियावर पोस्ट करून केली जात आहे. या पोस्टमध्ये कितीही संकटे आले तरी हार न मानणारे, पक्षासाठी स्वतःला अर्पण करणारे हे निष्ठावंत कार्यकर्तेच भाजपची खरी ताकद आहेत. भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता सत्ता असो किंवा नसो, पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहतो. ही पोस्ट आहे फक्त त्यांच्या सन्मानासाठी, जे वर्षानुवर्षे तन, मन, धन देऊन पक्षासाठी झटत आहेत. आज पक्षाचे दिवस बदलले आहेत, अनेक चेहरे स्वार्थासाठी बदलले आहेत; पण काही लोक अजूनही भाजपशी एकनिष्ठ आहेत. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. महापालिका निवडणुकीच्या या काळात निवड समितीकडे ही विनंती आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य सन्मान, न्याय आणि स्थान द्या, असे पोस्टमध्ये नमूद केले आहे.