कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:28 IST2025-07-08T13:27:40+5:302025-07-08T13:28:51+5:30
सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल
- दुर्गेश मोरे
पुणे : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) आतापर्यंत गुन्ह्यांची उकल केली म्हणून अनेकवेळा बक्षिसे घेतली. वरिष्ठांनी या विभागाच्या प्रमुखासह कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली. मात्र, असे काही गुन्हे आहेत की, त्यांचा वर्षोनुवर्षे छडा लावण्यात वारंवार अपयश येत आहे. काही गंभीर गुन्ह्यांतील संशयितांना तत्काळ जामीनही मंजूर झाले. सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.
इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे एक वर्षापूर्वी एका हॉटेलमध्ये १० जणांनी मिळून पिस्तूल व कोयत्याच्या साहाय्याने अविनाश धनवे (रा. वडमुखवाडी चन्होली ता. हवेली) यांची निघृण हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी खुशाल तापकीर आणि विशाल तापकीर (दोघेही रा. वडमुखवाडी चन्होली, ता. हवेली) अद्याप फरार असून, पोलिसांना त्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. गुन्हेगार एक वर्षापासून फरार असतानाही पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे. खेड आणि जेजुरी भागातही गंभीर खुनाच्या घटना घडल्या असून, आजतागायत त्यांचे गूढ उलगडलेले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणांचा तपास अपूर्ण असून मृतांच्या नातेवाइकांमध्ये नाराजी पसरली आहे.
तर लोणावळा परिसरात एका नामांकित उद्योजकाच्या घरावर वारंवार दरोडे टाकले जात आहेत. चोरीस गेलेला माल अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांकडे चौकशी केली असली तरी गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असे दिसते. एलसीबीला आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गुप्त माहिती नेटवर्क अधिक कार्यक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यात वाढत्या बंदूकबाजीमुळे चिंता
पुरंदर तालुक्यात बंदुकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाद, सट्टेबाजी व जमीन व्यवहारातील वादातून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा सुळसुळाट होत असतानाही पोलिसांकडून त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
महादेव बेटिंग अॅपचा तकलादू तपास
नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या 'महादेव बेटिंग अॅप' प्रकरणातही तपास अतिशय संथ आहे. आर्थिक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंगसारखा गंभीर आरोप असूनही आरोपींना लवकरच जामीन मिळाला. त्यापैकी काहीजण सध्या परदेशात असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा नेमकी कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.