भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:20 IST2025-05-16T09:18:57+5:302025-05-16T09:20:15+5:30
सरकारने सेवा भरती नियमामध्ये दुरुस्ती करून तांत्रिक अर्हता निश्चित केल्यामुळे २०१२ पासून नियुक्ती दिली जाते.

भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प
पुणे :तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे भूमिअभिलेख विभागातील सर्वच कार्यालयांचे कामकाज गुरुवारी (दि. १५) ठप्प झाले. त्यामुळे कार्यालये ओस पडली होती. दरम्यान, आंदोलनामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर घोषणांनी दुमदुमून गेला होता. या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी देण्यासाठी राज्य सरकारने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालाला एक वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे.
सरकारने सेवा भरती नियमामध्ये दुरुस्ती करून तांत्रिक अर्हता निश्चित केल्यामुळे २०१२ पासून नियुक्ती दिली जाते. परंतु या पदाकरिता वेतन कारकून संवर्गातील दिले जात असल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. तसेच २०१४ मध्ये संघटनेने केलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेले नाही. यासह इतर अनेक मागण्या आहेत. त्यासाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.