Pune: एनडीए रोडवर कोयता गँगची दहशत; दुकानांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:20 IST2023-05-24T14:17:08+5:302023-05-24T14:20:01+5:30
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून...

Pune: एनडीए रोडवर कोयता गँगची दहशत; दुकानांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून दुकानांवर दगडफेक केली. ही घटना एनडीए रोडवरील उत्तमनगर परिसरात घडली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना आरोपींनी बांबूने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तीन साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत आकाश किंडरे (वय २६, रा. उत्तमनगर) हे जखमी झाले असून, त्यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश वाघमारे (२२, रा. राहुलनगर, शिवणे, उत्तमनगर), प्रतीक संजय नलावडे (२४, रा. गंगा बिल्डिंग, कोंढवे धावडे) याला अटक केली आहे.
आकाश किंडरे याची आरोपी वाघमारे, नलावडे यांच्याशी चार दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. उत्तमनगरमधील विठ्ठल मंदिरासमोरील रोडवर रविवारी रात्री ९ च्या सुमारास वाघमारे, नलावडे आणि तीन साथीदारांनी किंडरेला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना बांबूने मारहाण केली. शेजारी असलेल्या चिकन विक्री आणि केशकर्तनालयावर दगडफेक करून दहशत माजवली अन् पळून गेले. सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.