पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:46 IST2024-07-04T12:45:40+5:302024-07-04T12:46:31+5:30

भांडणाच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १) सायंकाळी घडली...

Killing a young man by stabbing him with an animosity; Incident on Talegaon-Chakan road | पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

सनी रामदास तुळवे (२६), चंद्रकांत भीमराव तुळवे (३४, दोघे रा. खालुंब्रे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तुळवे (३०, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाचा प्रणय प्रदीप ओव्हाळ (२१, रा. कान्हे फाटा, वडगाव, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणय आणि त्यांचा मामा गणेश हे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. ते तळेगाव-चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊससमोर आले असता दोन संशयित हे दुचाकीवरून आले. त्यांनी गणेश यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, संशयितांच्या तावडीतून मामाला सोडविण्यासाठी फिर्यादी प्रणय गेले असता संशयितांनी त्यांच्यावरही कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रणय हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी सनी आणि चंद्रकांत या दोघांना अटक केली. अन्य संशयितांच्या मागावर पोलिस पथके रवाना केली आहेत.

Web Title: Killing a young man by stabbing him with an animosity; Incident on Talegaon-Chakan road