पत्नीचा खून करून विशेष मुलाला अडकवले; अखेर तपासात पतीने केल्याचे उघड झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:49 AM2022-11-17T08:49:14+5:302022-11-17T08:49:22+5:30

पोलिसांनी या खुनातील तपासाची चक्रे पुढे वेगाने फिरवली असता आरोपी पतीने दिलेल्या उत्तरात विसंगती आढळली

Killed his wife and ensnared his son Finally the investigation revealed that the husband did it | पत्नीचा खून करून विशेष मुलाला अडकवले; अखेर तपासात पतीने केल्याचे उघड झाले

पत्नीचा खून करून विशेष मुलाला अडकवले; अखेर तपासात पतीने केल्याचे उघड झाले

Next

वडगाव कांदळी (पुणे) : शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी झालेल्या महिलेच्या खुनाचा मुख्य सूत्रधार मुलगा नसून महिलेचा पती असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी शिरोली तर्फे आळे या ठिकाणी तंबाखूला पैसे दिले नाही म्हणून मुलाने रागाच्या भरात आईच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची तक्रार महिलेचे पती बारकू सखाराम खिलारी (वय ६६) यांनी दिली होती. या घटनेत अंजनाबाई बारकु खिलारी (वय ६०) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव पोलिसांनी या घटनेतील संशयित मुलगा अमोल बारकु खिलारी (वय २३) यास अटक केली होती. त्याने तसा कबुली जबाबही दिला होता.

पोलिसांनी या खुनातील तपासाची चक्रे पुढे वेगाने फिरवली असता आरोपी बारकू यांनी पोलिसांना दिलेल्या उत्तरात विसंगती आढळली. त्यातच त्यांचा मुलगा अमोल हा गतिमंद असल्याचे दिसून आले. पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच या खुनातील फिर्यादी म्हणजेच महिलेचे पती बारकू सखाराम खिलारी हाच आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्याने तसा कबुली जबाबही दिला.

सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खुनात निष्पन्न झालेला संशयित बारकु खिलारी याच्यावर कर्ज झाले होते. त्याला तेथील शेतजमीन विकून दुसरीकडे स्थलांतरित व्हायचे होते. यामुळे अंजनाबाई व बारकू या पति-पत्नींमध्ये नेहमीच वाद होत होते. मंगळवारी अशाच वादातून बारकू याने प्रथम अंजनाबाई यांच्या दिशेने विळा फेकून मारला. तो त्यांच्या तोंडाला लागला. त्यानंतर पुढे जाऊन भांडण अधिक तीव्र झाले व रागातून बारकू याने बायकोच्या डोक्यात खोरे घालून तिला यमसदनी धाडले. आपला मुलगा गतिमंद असल्याचे त्याला माहीत असल्यामुळे त्याने मुलाला ”तू पोलिसांना मी सर्व काही केले असे म्हण”, बाकी मी सांभाळून घेतो म्हणून कपडे घालून बाहेर निघून जात मुलानेच खून केल्याचा बनाव केला. मात्र तपासात अखेर बारकू हाच खुनी निघाला. पोलिसांनी त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.

Web Title: Killed his wife and ensnared his son Finally the investigation revealed that the husband did it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.