पुणे : धनकवडीतील मोहननगर भागात व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून युवकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता सोमनाथ गायकवाड (वय ३९, रा.माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे साथीदार समीर खेडेकर आणि सागर बडदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा साळुंखे (वय ३६, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड या बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करतात़. साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी तिच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यापैकी काही पैसे त्यांनी दिले. व्याजाने दिलेल्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला होता. गायकवाड यांनी त्यांच्याकडे आणखी पैसे मागितले होते. गायकवाड, तिच्याबरोबर असलेले साथीदार खेडेकर, बडदे सोमवारी रात्री साळुंखेच्या घरी गेले. त्यांनी साळुंखेंकडे तातडीने पैसे देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. साळुंखेंचा मुलगा महेश याला खेडेकर आणि बडदे यांनी त्याला घरातून बाहेर नेले. मोहननगर भागातील एका मैदानावर नेऊन त्याला चामडी पट्टयाने मारहाण केली. गायकवाड यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करत आहेत.
धनकवडीत युवकाचे अपहरण करुन मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:48 IST
व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून युवकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
धनकवडीत युवकाचे अपहरण करुन मारहाण
ठळक मुद्देमहिलेला अटक : व्याजाने दिलेल्या पैशाचे प्रकरण