kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:37 IST2021-11-15T16:37:09+5:302021-11-15T16:37:53+5:30
माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले

kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी नियमांचे पालन करत दर्शनरांगेतून माऊलींच्या संजीवन समाधीचे मुख दर्शन घेतले. तर टाळ - मृदुंगाच्या निनादात तसेच 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात माऊलींची पालखीतून नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. याप्रसंगी हजारो भाविकांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.
तत्पूर्वी, पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीनंतर कार्तिकीच्या मुहूर्तावर अलंकापुरीत भाविकांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांनंतर तीर्थक्षेत्र आळंदी भाविक भक्तांनी गजबजून निघाली असून कोरोनापूर्वी सारखी वाटू लागली आहे.
दरम्यान आजोळघरातील दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. प्रवेशावेळी प्रत्येक वारकऱ्याचे तापमान तपासणी व मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. दर्शनानंतर भाविकांना पानदरवाज्यातून बाहेर सोडले जात होते. दिवसभरात सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.