'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:52 IST2025-04-23T11:51:11+5:302025-04-23T11:52:22+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक (DySP) पदी थेट नियुक्तीचे आदेश दिले.

Justice for bravery, salute for sacrifice Chief Minister devendra fadnavis gift to the wife of 26/11 attack martyr Ambadas Pawar | 'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

पुणेमुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक (DySP) पदी थेट नियुक्तीचे आदेश दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या या समारंभात कल्पना पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार मानले. ही नियुक्ती अंबादास पवार यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान म्हणून करण्यात आली आहे.

२६/११ च्या हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताजमहाल पॅलेस, ओबेरॉय ट्रायडेंट, नरिमन हाऊस यासह अनेक ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्यात १७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी झाले. अंबादास पवार, जे रात्रीच्या ड्युटीसाठी संरक्षण युनिटकडे जात होते, यांनी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

कल्पना पवार यांनी आपल्या पतीच्या बलिदानाला साजेसे कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी म्हटले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी आणि शहीदांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे.” ही नियुक्ती म्हणजे शहीदांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा निर्णय असल्याचे कल्पना पवार यांनी सांगितले. कल्पना पवार यांच्या नियुक्तीने त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

नीरा (ता.पुरंदर) येथील स्व. शिवाजी देशमुख यांना विजय, अजय व कल्पना ही तीन मुले आहेत. कल्पना या नीरा येथे बारावीपर्यंत शिकल्या आणि २७ मे २००५ रोजी अंबादास पवार (रा. कवठे ता. वाई जि. सातारा) यांच्याशी विवाह झाला. अंबादास यांचेही शिक्षण नीरानजीक पाडेगाव येथील समता आश्रमशाळेत झाले होते. बारावीनंतर २००५ मध्येच ते मुंबई पोलिस शिपाई म्हणून रूजू झाले होते. अंबादास आणि कल्पना यांना विवेक हा मुलगा झाला. नीरा येथे माहेरी येऊन विवेकचे शिक्षण चालू ठेवले. त्यांना कॉन्स्टेबलपदाची नियुक्ती मिळू शकत होती.

त्याऐवजी त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचा अभ्यास सुरू केला. पदवीनंतर २०१९ मध्ये पोलिस उपअधीक्षकपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. सरकारदरबारी अनेक हेलपाटे घातले. बंधूंनी मोठा आधार दिला. अखेर लालफितीत अडकलेल्या प्रस्तावाला राज्यसरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्पना पवार यांना न्याय दिला आहे. कल्पना यांचा मुलगा विवेक हा सोमेश्वर विद्यालयात (ता.बारामती) बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे.

उशीरा का होईना पवार व देशमुख कुटुंबीयांना आधार मिळणार आहे. मंगळवारी फडणवीस यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर नीरा येथील कल्पना पवार यांना नियुक्ती आदेश देतानाची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. माध्यमांशी बोलताना कल्पना पवार-देशमुख म्हणाल्या, पदवी प्राप्त करून मी २०१९ मध्ये अर्ज केला होता. अखेर मात्र महायुती सरकारनेच मला न्याय दिला. कल्पना यांचे बंधू विजय देशमुख म्हणाले, खूप वर्ष तीने संघर्ष केला. मंत्रालयात अनेक हेलपाटे मारले आणि अखेर यश मिळाले याचे समाधान वाटतेय.

Web Title: Justice for bravery, salute for sacrifice Chief Minister devendra fadnavis gift to the wife of 26/11 attack martyr Ambadas Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.